Home / News / लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मालडब्यातून प्रवासाची मुभा

लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मालडब्यातून प्रवासाची मुभा

*हायकोर्टाच्या आदेशानंतरमध्य रेल्वेचा निर्णय मुंबई – लोकलमधील गर्दीचा सामना करताना सर्वाधिक त्रास हा ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला, मुलांना होतो....

By: E-Paper Navakal

*हायकोर्टाच्या आदेशानंतर
मध्य रेल्वेचा निर्णय

मुंबई – लोकलमधील गर्दीचा सामना करताना सर्वाधिक त्रास हा ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला, मुलांना होतो. त्यामुळे आता रेल्वेचा मधला मालडबा ज्येष्ठांसाठी खुला ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त करत ज्येष्ठांसाठी तशी सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय न्यायालयासमक्ष जाहीर केला.

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे ज्येष्ठ नागरिकांना मुंबई लोकलमध्ये स्वतंत्र डबा देण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी येत्या दोन वर्षांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करून दिला जाईल. तसेच, हा डबा तयार केला जाईपर्यंत ज्येष्ठांना मालडब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येईल, असेही प्रशासनाने न्यायालयात सांगितले.प्रशासनाच्या निवेदनावर न्यायालयाचे समाधान झाल्यानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली.

ज्येष्ठांसाठी पश्चिम रेल्वेवर १०५, तर मध्य रेल्वेवर १५५ लोकल गाड्यांमधील मालडब्यांच्या रचनेत बदल केला जाणार आहे. हा बदल करताना सध्याच्या लोकल सेवेवर कुठलाही परिणाम होऊ न देता हे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण केले जाईल. त्यानंतर ते विशेष राखीव डबे ज्येष्ठांसाठी उपलब्ध केले जातील, असे मध्य रेल्वेने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले.

Web Title:
संबंधित बातम्या