वैष्णवीच्या सासरे-दिराला सात दिवसांनंतर अटक

पुणे- पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेले तिचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी आज पहाटे अटक केली. न्यायालयाने त्यांना 28 मेपर्यंत पोलीस कोठडी दिली. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी पोलिसांनी बोलावलेली पत्रकार परिषद दोनच मिनिटात गुंडाळली. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांवर कुणाचा दबाव आहे की का, असा प्रश्न विचारला जात आहे.
वैष्णवी आत्महत्या प्रकरणात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला आधीच अटक करण्यात आली होती. तर सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे हे आरोपी गेल्या सात दिवसांपासून फरार होते. यावरून राज्यभरात संताप व्यक्त केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोघांना 12 तासांच्या आत अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या. ते सतत आपले ठिकाण बदलत असल्यामुळे पोलिसांना सापडत नव्हते. अखेर आज या दोघांनाही पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली. अटकेपूर्वी आरोपींनी एका हॉटेलमध्ये मित्रांसोबत मटण पार्टी केली होती. त्याचे सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाले. मावळ तालुक्यातील तळेगाव येथील हे हॉटेल आहे. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्यावर त्यांनी सूत्रे हलवली. मात्र, जेवणानंतर हगवणे पितापुत्र तिथून पसार झाले. पोलिसांनी नाकाबंदी करून संपूर्ण परिसराची झडती घेतली. पहाटे साडेपाच वाजता त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाबाहेर भाजपाने हगवणे कुटुंबाविरोधात आंदोलन केले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांकने तिला ज्या पाईपने मारहाण केली तो पाईपही जप्त केला आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, आम्हाला पाचही आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. याशिवाय वैष्णवीच्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे, वैष्णवीच्या स्त्रीधनाचे काय झाले, राजेंद्र व सुशील हगवणे फरार असताना कुठे होते याचाही तपास करायचा आहे. हा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राजेंद्र व सुशील हगवणेला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बावधन पोलिसांनी आज सकाळी या अटकेसंदर्भात पत्रकार परिषद घेतली. पण ती अवघ्या 2 मिनिटांतच गुंडाळली. त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. बावधन
पोलीस म्हणाले की, बावधन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबातील तीन जण अटकेत होते. उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके तैनात करण्यात आली होती. या पथकांनी दोघांना आज पहाटे स्वारगेट येथून अटक केली. या प्रकरणी सर्व पुरावे गोळा केले जात आहेत. त्यानंतर योग्य कलमांखाली दोषारोपपत्र तयार केले जाईल. या संपूर्ण तपासाला शेवटापर्यंत नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तशा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना आलेल्या आहेत. एवढे बोलून पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद संपवली.
काल वैष्णवीचे बाळ तिच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आले. आज या बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. वैष्णवीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाच्या अंगावर इंजेक्शन दिल्याचे व्रण आहेत. बाळाला हे इंजेक्शन कोणी दिले, हे इंजेक्शन कसले होते, यामुळेच बाळाची प्रकृती बिघडली का, असे अनेक प्रश्न नातेवाईकांच्या मनात निर्माण झाले. कस्पटे कुटुंबियांनी बाळाचे नाव बदलून गुरू वैष्णवी कस्पटे करण्याची मागणीही केली.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वैष्णवीच्या माहेरच्या घरी भेट देऊन कस्पटे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, महिला आयोगाकडे 6 नोव्हेंबर 2024 रोजी करिष्मा (वैष्णवीची नणंद) हगवणेने तक्रार केली. त्याच दिवशी मयुरीच्या (मोठी सून) भावाने (मेघराज जगताप) यानेही महिला आयोगाकडे तक्रार केली. त्या तक्रारी पोलिसांकडे पाठवण्यात आल्या. त्यानुसार 7 नोव्हेंबर रोजी बावधन पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. हा कौटुंबिक वाद होता. त्यामुळे समुपदेशन करून तो मिटविण्याचा हेतू होता. मात्र वैष्णवीसंदर्भात महिला आयोगाकडे कोणतीही तक्रार आली नव्हती. पोलिसांनी या प्रकरणी चांगला तपास केला. बाळाला वैष्णवीच्या आई-वडिलांकडे सुखरुप
सोपवले आहे. कस्पटे कुटुंबाच्या भेटीला आलेल्या चाकणकर यांना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. मयुरी जगताप व अश्विनी कस्पटे यांच्यासारख्या इतर
भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कमी पडलात हे मान्य करा. महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या प्रोटोकॉलमधून बाहेर पडा. तुम्ही वेळेत दिवे लावले असते, तर आज ही वेळ आली नसती, असे छावाचे कार्यकर्ते धनंजय जाधव, अश्विनी खाडे यांनी चाकणकर यांना सुनावले. त्यावेळी चाकणकर म्हणाल्या की, हे अति होत आहे. आम्ही सुमोटो दाखल केला आहे. पोलीस अधीक्षकांना सर्व कागदपत्रे दिली होती. कारवाईच्या सूचनाही दिल्या होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या प्रकरणावर म्हणाले की, आरोपींवर कायद्याने जी काही कडक कारवाई करता येईल ती सर्व कारवाई केली जाईल. मकोका लावण्याकरता काही नियम आहेत. त्या नियमात बसले तर मकोकाही लागू शकेल. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कस्पटेकुटुंबाची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की, हे प्रकरण आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी पाठपुरावा करू.