Home / News / Farmers Block Ministerial Visit : मंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेरले! अडवले, जाब विचारला ! मदतीच्या पिशव्यांवर शिंदेंचे फोटो पाहून संताप

Farmers Block Ministerial Visit : मंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेरले! अडवले, जाब विचारला ! मदतीच्या पिशव्यांवर शिंदेंचे फोटो पाहून संताप

Farmers Block Ministerial Visit – अतिवृष्टीने शेतजमीन खरवडून गेलेल्या मराठवाड्यात (Marathwada)आज अखेर सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra...

By: Team Navakal
Farmers Block Ministerial Visit

Farmers Block Ministerial Visit – अतिवृष्टीने शेतजमीन खरवडून गेलेल्या मराठवाड्यात (Marathwada)आज अखेर सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde)व अजित पवार (DCM Ajit Pawar) , कृषिमंत्री भरणे (Agriculture Minister Bharne)अशा डझनभर मंत्र्यांनी दौरा केला. मात्र शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी मंत्र्यांना घेरले, त्यांच्या गाडीचा ताफा अडवला, ओला दुष्काळ कधी जाहीर करणार, असा जाब विचारला.

यामुळे मंत्र्यांना अनेक ठिकाणाहून पळ काढावा लागला. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत म्हणून वस्तूंची कीट आणली होती, पण त्यावर स्वतःचे छायाचित्र छापले होते. ते पाहून शेतकरी भडकले. एका गावाने तर ही कीट परत पाठवून दिली.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पाहणी दौरा सुरू असतानाच धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ब्रँडिंग करणारे 18 टेम्पो येऊन पोहोचले. युवासेनेच्या माध्यमातून पोहोचलेल्या या टेम्पोंवर शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे ठसठशीत फोटो असलेले बॅनर लावण्यात आले होते.

या टेम्पोमध्ये 12 जीवनावश्यक वस्तू असलेले 10 हजार मदतीचे किट होते. या किटवरही शिंदे, सरनाईकांचे फोटो होते. मंत्र्यांच्या लवाजम्यासह दुपारी एक वाजताच्या सुमारास शिंदे हेलिकॉप्टरने धाराशिवला पोहोचले. 

यावेळी पालकमंत्री सरनाईक, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, शिवसेना आमदार तानाजी सावंत उपस्थित होते. परंड्यातील कराळे वस्ती येथे मंत्र्यांसोबत बोटीवर बसून शिंदेंनी पूरस्थितीची पाहणी केली. जिल्ह्यात 90 हजार हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाल्याचे शिंदेंनी सांगितले. कराळे वस्ती येथे शिंदेंच्या हस्ते युवासेनेच्या मदत किटचे वाटप करण्यात आले. पण हे मदत वाटप शिंदेंच्या ब्रँडिंगमुळे वादात सापडले. 

शिंदेंवर टीकेची झोड उठली. शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले की, काही लोक परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या दाढीचे आणि चेहऱ्याचे फोटो टाकून मदत वाटत आहेत आणि राजकारण करत आहेत. लोक मरत असताना आणि गावे वाहून जात असताना प्रचाराचे राजकारण करणे हा निर्लज्जपणा आणि अमानुषपणा आहे. 

शिंदेंच्या किटवरील भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रियाही चर्चेत राहिली. ते म्हणाले की, मदतीत जाहिरातबाजी येऊ नये. मते मिळवण्याचा हा प्रसंग नाही. लोकांना आधार देण्याचे हे काम आहे. जाहिरातबाजी न करण्याची जबाबदारी आपली आहे.

यावर शिंदेंनी पुन्हा प्रतिक्रिया दिली की, फोटो न बघता मदत बघावी. सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून लोकांच्या मदतीला धावले पाहिजे. कार्यकर्त्यांनी काही मदत केली असेल तर आपण त्या बॅगमध्ये काय आहे? यावर लक्ष दिले पाहिजे. फोटोंवर लक्ष देण्याची गरज नाही. आरोप करणाऱ्यांना राजकारण करायचे आहे, दुसरे काही नाही.

सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरने सोलापूरला पोहोचले. जिल्ह्यातील माढा तालुक्यातील नुकसानीची त्यांनी हेलिकॉप्टरने पाहणी केली. माढा तालुक्यातील निमगाव येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. 

मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली, यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अभिजीत पाटील आणि भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते.पत्रकारांनी फडणवीसांना राज्यात ओला दुष्काळ घोषित करण्याच्या मागणीसंबंधी प्रश्न केला. फडणवीसांनी हा प्रश्न मोठ्या शिताफीने टोलावला.

ते म्हणाले की, ओला दुष्काळ ही बोली भाषेतील टर्म आहे. पण पावसामुळे जे जे नुकसान झाले आहे, त्या सगळ्या नुकसानीची भरपाई आणि साधारणतः आपण टंचाईच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो, त्या सगळ्या सवलती द्यायचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे सगळ्या सवलती देण्यात येतील. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना ऑक्टोबर 2020 मध्ये फडणवीसांनी विरोधी पक्षनेता म्हणून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.

फडणवीसांनी शेतकऱ्यांसोबतच ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या नागरिकांनाही मदत करण्याचे आश्वासन दिले. निकषकेंद्रीत नाही, तर नागरिककेंद्रीत मदत करण्यावर सरकारचा भर आहे. दिवाळी आधी थेट मदत केली जाईल, असे ते म्हणाले. 

सोलापूरनंतर मुख्यमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. उजनी येथे मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या संतापाचा फटका बसला. निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करू, असे म्हणाले. यावेळी टंचाई शब्द उच्चारताच उपस्थित शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ आणि मदत जाहीर करण्याची मागणी केली. 

कर्जमाफीचीही मागणी केली. फक्त घोषणा नको, तर हेक्टरी किती मदत देणार हे जाहीर सांगा, असे शेतकरी म्हणाले. यावर फडणवीसांनी राजकारण करू नका, असे मागणी करणाऱ्यांना सुनावले. यावेळी फडणवीसांचे सडलेले पीक हातात घेतलेले फोटो काढण्यात आले. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील औराद शहाजानी येथील पुलाची पाहणी केली. मांजरा आणि तेरणा नदीच्या संगमावरील या गावात पूरस्थितीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

आज भल्या सकाळीच हेलिकॉप्टरने पोहोचलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोलापूरमधील पूरग्रस्त भागाचा झंझावाती दौरा केला. करमाळा तालुक्यातील कोर्टी इथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील वरकुटे, रोपळे (क), कव्हे, मुंगशी, बारलोणी, कुर्डूवाडी या गावांमध्ये शेतकरी व नागरिकांशी संवाद साधला. निवारा केंद्रालाही (रेस्क्यू सेंटर) भेट दिली.

पुरामुळे विस्थापित झालेले शेतकरी व नागरिकांची भेट घेतली. कोळेगाव धरण 160 टक्के भरले असतानाही धरणातून कोणतेही पूर्वनियोजन न करता पाणी सोडल्याने पूरस्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावर कोणाची चूक झाली, तर कारवाई केलीच जाईल. पण ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने पाणी नियोजित पद्धतीने सोडणे शक्य नाही, असे पवार म्हणाले.

मदतीचे आश्वासन देणाऱ्या अजित पवारांकडे शेतकऱ्यांनी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. आपल्या नुकसानीचा पाढा वाचला. पण अजित पवारांनीही ओल्या दुष्काळाच्या मागणीवर मौन बाळगले. वालवड गावात शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

कागदोपत्री पंचनामे करत बसण्याऐवजी सरसकट मदतीची मागणी केली. सातबारा कोरा करण्यास सांगितले. माढ्यात शेतकरी सन्मान योजनेचे 12 हजार रुपये कधी येणार, असा प्रश्न एका वृद्ध शेतकऱ्याने केला.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना जालन्यात शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागला. ते बदनापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. यावेळी गेवराई गावातील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी कृषिमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. 

जिल्हाधिकाऱ्यांनी फळबागांचे पंचनामे करू नका, असे आदेश दिले आहेत. तुमची यंत्रणा शेतकऱ्यांना विचारतही नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याचा आरोपही केला. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा बघून कृषिमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यांनी गावातून काढता पाय घेतला.

दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज एक महत्त्वाची घोषणा केली. शेतकऱ्यांनी स्वतः नुकसानीचे फोटो काढून पाठवण्याची गरज नाही. कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करतील, असे त्यांनी जाहीर केले.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जालना व परभणीत तर मंत्री मेघना बोर्डीकरांनीही सेलू व जिंतूरचा पाहणी दौरा केला. उबाठा नेते उद्धव ठाकरे हेही उद्या गुरुवारी दौऱ्यावर जाणार आहेत. लातूर जिल्ह्यातील काडगाव, धाराशिवच्या इटकूर व पारगाव, बीडच्या कुर्ला, जालन्याच्या महाकाळा व छत्रपती संभाजीनगरच्या रजापूर येथे ते पाहणी दौरा करणार आहेत.

काँग्रेसने लातूर येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वॉर रूम सुरू केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते पूरग्रस्त भागांना भेटी देणार आहेत. धाराशिवच्या भूम तालुक्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनीही पूरग्रस्तांशी संवाद साधत पाहणी दौरा केला. सरकारने निकष न लावता नुकसान झाले तेवढी मदत द्यावी. अन्यथा महाराष्ट्र बंद केल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

धाराशिवला अतिवृष्टीमुळे

शेतकऱ्याची आत्महत्या

मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. भूम तालुक्यातील म्हात्रेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी लक्ष्मण बाबासाहेब पवार (42) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे दीड एकर जमीन होती. त्यांनी शेतात सोयाबीन आणि कांदा पिकाची लागवड केली होती.

मात्र, सततच्या मुसळधार पावसामुळे पिके वाहून गेली आणि शेतात साचलेल्या पाण्यामुळे उरलेले पीकही सडण्याच्या स्थितीत आले. यामुळे हताश झालेल्या लक्ष्मण पवार यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. लक्ष्मण पवार यांच्या आत्महत्येमुळे धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीचा पहिला बळी गेला आहे.

फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

पुरेशी मदत मिळत नसल्याने सोलापुरातील निमगाव आणि दारफळ येथे मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री फडणवीसांनी केवळ पाहणी केली. आमच्याशी चर्चा केली नसल्याचा पूरग्रस्तांनी आरोप केला. परंड्यातील करंजा गावात शिंदेंच्या ब्रँडिंगच्या टेम्पोंना पूरग्रस्तांचा रोषाचा सामना करावा लागला. पूरग्रस्तांनी टेम्पो परत पाठवले. तीन दिवसांपासून पुराचा विळखा आहे.

उपमुख्यमंत्री आल्यामुळे प्रशासन आल्याचा आरोप या पूरग्रस्तांनी केला. शिंदेंकडून धाराशिवमधील तीन तालुक्यात 50 टेम्पोंतून मदतीचे किट पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे जालन्यात कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्यावर शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. त्यामुळे कृषिमंत्र्यांना काढता पाय घ्यावा लागला.


हे देखील वाचा –

संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी ९ ऑक्टोबरला

अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त, राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईची पाणीचिंता मिटली;११ महिन्याचा पाणीसाठा

Web Title:
संबंधित बातम्या