Petrol – Diesel Prices Rise Again Within 4 Days – देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर अवघ्या चार दिवसांत पुन्हा एकदा वाढले आहेत. आज पेट्रोलच्या दरात 91 पैशांनी, तर डिझेलच्या दरात 94 पैशांनी वाढ झाली आहे. याआधी 15 मे रोजी पेट्रोल, डिझेलच्या किमतीत 3 रुपयांची वाढ केली होती.
या भाववाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर आता 98.64 रुपये तर डिझेलचा दर 91.58 रुपये प्रति लीटर झाला आहे.
तर मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.08 रुपये प्रति लीटर झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी चढ-उतार झाली आहे. इराण-अमेरिका संघर्षामुळे क्रूड ऑईलचे दर 70 डॉलर वरून 111 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांवर दबाव आला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत सरकारने याबाबतीत निर्णय घेतला नव्हता. पण चार दिवसांपूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या भावात पहिल्यांदा तीन रुपयांची वाढ केली. त्यावेळीच पुन्हा भाववाढीची शक्यता वर्तवण्यात आली होती. ती आज खरी ठरली.
इंधन दरवाढीवरून सर्वसामान्यांमध्ये रोष असतानाच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. जळगावमधील सर्व पेट्रोल पंप कोरडे पडले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून डिझेलचा पुरवठा पूर्णपणे बंद आहे. जिथे पेट्रोल-डिझेल आहे, त्या पंपांवर 2 ते 4 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. याचा मोठा फटका वाहतूक व्यवसायाला बसला आहे. वाशिम आणि अकोला येथे तीव्र इंधनटंचाई निर्माण झाली असून, डिझेलसाठी शेतकर्यांची झुंबड उडाली आहे.
काही ठिकाणी रांगेत नंबर लावण्यावरून वाहनधारकांमध्ये हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील 35 पैकी 20 पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा पूर्णपणे संपला आहे. शेतकर्यांना पंपांवर कॅन घेऊन तासन्तास उभे राहावे लागत आहेत. इंधन टंचाईमुळे हिंगोली-वाशिम महामार्ग आज काहीकाळ रोखण्यात आला होता. धाराशिव शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर
‘नो स्टॉक’चे फलक आणि बॅरिकेड लावून ते बंद करण्यात आले आहेत. बीडच्या केज भागात हेच चित्र आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथे डिझेल भरण्याच्या वादातून ग्राहकांमध्ये मोठा वाद झाला आहे. रत्नागिरी येथे सीएनजीसोबतच पेट्रोल आणि डिझेलचाही मोठा तुटवडा जाणवत आहे. पंपाबाहेर किलोमीटरभर लांब रांगा लागल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथील पंपांवर आणि रायगडच्या अंतर्गत भागांत इंधन संपल्याच्या अफवांमुळे पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी झाली.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यासह ग्रामीण भागात डिझेल आणि पेट्रोल न मिळाल्यामुळे शेतकर्यांची मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास निम्म्या पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे बोर्ड दिसत आहेत. पुणे जिल्हा प्रशासनाने आणि पेट्रोल-डिझेल असोसिएशनने स्पष्ट केले आहे की, इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. केवळ अफवांमुळे नागरिक गरजेपेक्षा जास्त इंधन साठा करत आहेत. प्रशासनाने आणि पेट्रोलियम कंपन्यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि गरजेपुरतेच इंधन खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.










