State Employees, Nurses Begin Indefinite Strike – जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदांची भरती, कंत्राटी कर्मचार्यांचे नियमितीकरण यांसह विविध मागण्यांसाठी राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, नर्स यांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला. त्यामुळे अनेक ठिकाणी कामकाज ठप्प झाले. हिंगोली, सातारा, सांगली, परभणी, ठाणे, धुळे, रत्नागिरी, नागपूर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि सोलापूर जिल्ह्यांतील हजारो कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.
हिंगोली जिल्ह्यात सुमारे 7 हजार कर्मचारी संपात सहभागी झाले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. परभणीत 15 ते 18 हजार कर्मचारी संपात उतरले. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. सांगलीत कर्मचार्यांनी कामबंद करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील परिचारिका आणि इतर कर्मचारीही या संपात उतरले होते. तर छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालय तसेच ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि नागपूर येथील मनोरुग्णालयांतील कर्मचारीही संपात सहभागी झाले.
जोगेश्वरीतील ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात 130 हून अधिक कंत्राटी कामगारांनीही थकीत वेतन आणि पीएफच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला. ठाणे जिल्ह्यात संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि इतर शासकीय कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले. प्रमाणपत्रे, महसूल कामे आणि शासकीय योजनांशी संबंधित सेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचारी मागील 15 महिन्यांपासून शासनाच्या भूमिकेवर नाराज आहेत. सात वेळा आंदोलन करूनही ठोस निर्णय न झाल्याने अखेर बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी कर्मचार्यांचे समन्वय समितीचे निमंत्रक भास्कर गव्हाणे यांनी मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू राहणार असल्याचे सांगितले. राज्य सरकारने या संपाची गंभीर दखल घेत कर्मचार्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत कारवाईचा इशाराही कर्मचार्यांना दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच या प्रश्नावर तोडगा काढतील, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांनी दिली आहे.











