मुंबई- सिंगापूर, हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या दोन दिवसात झपाट्याने वाढत असतानाच मुंबईच्या केईएम रुग्णालयात कोरोनाचे 10 रुग्ण दाखल होते. त्यापैकी दोघींचा मृत्यू झाला असून इतर 8 जणांना उपचारासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या कोरोना विभागात दाखल केले आहे. सध्या फक्त केईएम रुग्णालयाची ही माहिती आहे. मुंबईतील इतर रुग्णालयाबाबतची माहिती पालिकेने व सरकारने त्वरित गोळा करावी आणि तातडीने उपचाराची उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. राज्य सरकारनेही कोरोनाच्या प्रश्नावर तातडीची बैठक बोलावली.
मुंबईच्या परळच्या केईएम रुग्णालयात गेल्या काही दिवसांत 10 रुग्णांची कोरोनासदृश लक्षणांसह नोंद झाली होती. त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात एका 59 वर्षीय महिलेचा आणि 13 वर्षीय मुलीचा समावेश आहे. ही महिला 14 मे पासून रुग्णालयात दाखल होती. महापालिका आणि रुग्णालय प्रशासनाने असे म्हटले आहे की, हे दोन्ही रुग्ण मुंबईबाहेरचे म्हणजे सिंधुदुर्ग आणि डोंबिवलीचे होते. त्यांच्या मृत्यूचे कारण कोरोना नसून त्यांना आधीपासून गंभीर आजार आहे. 59 वर्षीय महिलेचा मृत्यू कर्करोगामुळे, तर 13 वर्षीय मुलीचा मृत्यू मूत्रपिंडाच्या आजारामुळे झाला आहे. या रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही नैसर्गिक मृत्यू असे मृत्यूचे कारण लिहिण्यात आले आहे . परंतु मृत्युच्या काही वेळ आधी घेण्यात आलेल्या त्यांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोविड नियमांनुसार त्यांचे पार्थिव नातेवाईकांच्या हवाली न देता पालिकेतर्फे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोना चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालयाने नैसर्गिक मृत्यू म्हणून डेथ सर्टिफिकेट कसे दिले असा सवालही त्यांना विचारला. अजून 8 कोरोना रुग्ण आढळले त्यांना उपचारासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले आहे. त्यातील दोघांना घरी सोडण्यात आले असून 6 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आ. अजय चौधरी, दत्ता पोंगडे, अनिल कोकीळ, किशोरी पेडणेकर हे केईएमचे प्रभारी अधिष्ठाता परळकर व मोहन देसाई यांना भेटले. त्यांनी कोरोना संदर्भात रुग्णालयाने काय उपाययोजना केल्या, विलिनीकरण वॉर्ड तयार केले आहे का , या रुग्णांवर जे डॉक्टर , नर्स उपचार करीत होते , आजूबाजूला जे इतर रुग्ण होते त्यांची कोरोना चाचणी केली का, असे प्रश्न रुग्णालयाला विचारले.
एकेकाळची सिनेअभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वतः ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळल्याने महापालिका आणि आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच संसर्ग थांबवता यावा, यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. गरज पडल्यास कठोर कारवाई करण्याची तयारीही विभागाने केली आहे. सध्या घाबरण्याची गरज नाही. मात्र निष्काळजीपणा करू नये. विशेष करुन वृद्ध, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले लोक आणि परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांनी काळजी घ्यावी, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. 19 मे 2025 पर्यंत देशभरात कोरोनाचे 257 रुग्ण आढळले. त्यात केरळमध्ये सर्वाधिक 95 रुग्ण आहेत, त्यानंतर तामिळनाडूमध्ये 66 आणि महाराष्ट्रात 56 रुग्ण आहेत. मात्र, सध्या कोरोनाची कोणतीही मोठी लाट दिसत नाही, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे. आशिया खंडातील काही देशांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे भारतीय आरोग्य तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा आणि लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे.
सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडसारख्या देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला सिंगापूरमध्ये 14,000 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
जेएन – 1 कोरोनाचा नवा प्रकार
कोरोनाच्या नव्या लाटेसाठी ओमिक्रॉनचा नवीन प्रकार जेएन-1 आणि त्याचे बीए.2.86 सारखे काही उप-प्रकार जबाबदार आहेत. जेएन-1 ऑगस्ट 2023 मध्ये पहिल्यांदा आढळला होता. डिसेंबर 2023 मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने त्याला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट घोषित केले होते. या विषाणूत सुमारे 30 उत्परिवर्तने झाली आहेत. हा विषाणू रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, जेएन-1 पूर्वीच्या प्रकारांच्या तुलनेत अधिक सहजपणे पसरतो. तो फारसा धोकादायक नाही. मात्र त्याच्यामुळे डायरियासारखी लक्षणे दिसू शकतात. सामान्य रोग प्रतिकारक शक्ती जेएन-1 निष्क्रिय करण्यासाठी कोरोना लशीचा बुस्टर डोस घ्यावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
