अग्रलेख! ना. एकनाथ शिंदे नौटंकी बंद करा; कुणावरही कारवाई होणार नाही हे जाणतो

ठाण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या रस्त्यावर उठवून रस्त्यांवरील खड्डे दाखवत आरडाओरड केली. वाहिन्यांचे कॅमेरे समोर येताच पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. उगाच मोठा आवाज काढून पालिका आयुक्तांना खडसावले. एकनाथ शिंदेंनी ही नौटंकी त्वरित बंद करावी. अवघ्या महाराष्ट्राने खड्डे पडलेले पाहिले आहेत, पावसाळ्यापूर्वी ते भरताना बघितले आहेत, पहिल्या पावसात त्याच्यावरील खडी वाहून जाताना बघितली आहे. सर्वत्र हाच तमाशा सुरू आहे आणि हा तमाशा या वर्षीचा नाही तर वर्षानुवर्षे सुरू आहे. आजवर कधी कुणावर कारवाई होणार नाही याची जनतेला पूर्ण खात्री आहे. कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करायचे आणि मग इतर कुणी निविदा भरली नाही म्हणून त्याच कंत्राटदारांना काम द्यायचे हेही सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे.एकनाथ शिंदे तर तळागाळातून मंत्रिपदापर्यंत पोचलेत.

तळातून गाळात आणि गाळातून गाडीत, गाडीतून विमानात हा प्रगतीचा महामार्ग त्यांना नवीन नाही. ठाण्यात पारंपारिक खड्डे आहेत. ठाण्यातील माणूस घरून निघाला तर अर्ध्या तासानंतरही तो तिथेच असतो कारण खड्ड्यातून तो बाहेरच येत नाही. अगदी स्पीडब्रेकरही तुटून तिथे खड्डे झाले आहेत. तिथे पूल असे बांधले आहेत की पुलावरील पाण्याचा निचराच होत नाही. हे दारिद्य्र सतत आहे. ते कुणामुळे आहे तेही सर्वांना माहीत आहे. तरीही एक दिवस रस्त्यावर उतरून आरडाओरड करायची याला काय अर्थ आहे? त्यातून आरडाओरड ही पालिका कर्मचाऱ्यांवरच केली जाते. कारण मंत्र्यासमोर तोंड उघडायची त्यांची हिंमत नाही. मान खाली घालून ऐकून घ्यायचे आणि संध्याकाळी खिशात हात घालून गप्प घरी जायचे याची सवयच लागली आहे. मंत्र्यांचा ऐब राखायचा आणि आपले पोस्टिंग टिकवायचे याच्याशीच मतलब राहतो. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्याला झोडणे हे सोयीचे आणि सुरक्षित असते.

एकनाथ शिंदे आयुक्तांना म्हणाले की, ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा, दोषींवर कडक कारवाई होईल. पावसाळ्यात खड्ड्यांवरील खडी वाहून कशी जाते? एकनाथ शिंदे स्वत: जिथे राहतात त्या नितीन कंपनी परिसरात खड्डे आहेत. गेल्या वर्षी होते, त्याच्या आदल्या वर्षी होते, आज आहेत, उद्याही असणार आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मोठे नेते आहेत. ज्या पालिकेवर आणि ज्या सरकारवर रस्त्यांची जबाबदारी आहे तिथे सर्वत्र शिवसेनेचीच सत्ता आहे. ही सत्ता अलिकडे नव्याने आलेली नाही. ठाण्यातील खड्डे जितके जुने आहेत तितकी जुनी शिवसेनेची सत्ताही आहे. सामान्य माणूस वर्षानुवर्षे हाल सोसतो आहेत. मुंबईत तेच, ठाण्यात तेच, कोकणात जाताना तेच चित्र आहे. चार तासांचा प्रवास नऊ तासातच संपतो. या खड्डयातून काहींचे महाल उभे राहिले, कंपन्या आल्या, हेलिकॉप्टर आली. सामान्य माणसाची मात्र टायर फाटली, नोकरीवर लेटमार्क लागला, काहींचा जीव गेला. आता तर सतत उखडणारे पेव्हर ब्लॉक टाकून खड्डे बुजवण्याचा चमत्कार सुरू आहे. म्हणूनच म्हणतो, एकनाथ शिंदे तुम्ही नौटंकी करू नका. तुमचे पाहून सर्व पालकमंत्री हेच सुरू करतील याचीच आम्हाला धास्ती आहे.

Scroll to Top