नवी दिल्ली-मनोरंजन क्षेत्रातील झी एंटरटेनमेंट एंटरटप्रायझेस,सोनी पिक्चर्स आणि वायकॉम १८ यासारख्या दिग्गज कंपन्यानी सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. या सर्व प्रसारकांनी वाढत्या सामग्री खर्चाची भरपाई करण्यासाठी टीव्ही चॅनेलच्या किंमती वाढवल्या आहेत.नववर्षातील १ फेब्रुवारीपासून सोनी आणि वायकॉम १८ चॅनेलच्या किंमती २० ते २५ टक्क्यांनी वाढवल्या आहेत.झी कंपनीने त्यांच्या चॅनेलमध्ये ९ ते १० टक्क्यांनी वाढ केली आहे.त्यामुळे ग्राहकांचे मासिक बिल वाढणार आहे.
‘ट्राय ‘ च्या नियमानुसार चॅनेल कंपन्या आपल्या नवीन दराची घोषणा केल्यानंतर महिनाभरात ते दर लागु करू शकतील. डिस्ने स्टारने अद्याप त्याची किंमत जाहीर केलेली नाही. २०२४ हे निवडणूक वर्ष असल्याने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय ग्राहकांची नाराजी टाळण्यासाठी ब्रॉडकास्टर रेट कार्डचे काळजीपूर्वक निरीक्षण करत आहे.वायकॉम १८ ने आपल्या चॅनेलच्या दरात मोठी वाढ केली आहे.कारण या कंपनीने इंडियन प्रीमियर लीगचे डिजिटल हक्क, बीसीसीआय मीडिया हक्क,क्रिकेट दक्षिण आफ्रिका मीडिया हक्क आणि ऑलिंपिक २०२४ आदी प्रमुख स्पर्धकांचे हक्क खरेदी केले आहेत.वायकॉम १८ ने यासाठी ३४ हजार कोटी रुपयांची मोठी रक्कम गुंतवली आहे.ही भरपाई करण्यासाठी कंपनीने चॅनेलचे दर वाढवले आहेत.