हनुमान चालिसाप्रकरणी कोर्टाकडून राणा दाम्पत्याला दिलासा नाही

मुंबई- मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठणप्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राणांनी दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या अर्जाला मुंबई सत्र न्यायालयात मुंबई पोलिसांनी विरोध केला. या अर्जातून त्यांनी केलेले दावे पोलिसांनी अमान्य करत या खटल्यावर ठाम असल्याचे स्पष्ट सांगितले. सर्व आरोप पुराव्यानिशी सिद्ध करू असेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे.

दाखल एफआयआर खोट्या आणि खोडसाळ माहितीच्या आधारावर असल्याचा दावाही पोलिसांनी फेटाळून लावला आहे. याप्रकरणातील साक्षीदार हे शासकीय कर्मचारी असून सीआरपीसी कलम 313 नुसार गुन्ह्याची रितसर नोंद करण्यात आली आहे. यावर खटल्यादरम्यान साक्षीदार हजर होतील तेव्हा त्यांच्या साक्षी पुराव्यातून हे सर्व आरोप स्पष्ट होतील. त्यामुळे या टप्प्यावर दाखल केस खोटी आहे हा दावा मान्य करता येणार नसल्याचे मुंबई पोलिसांनी या उत्तरातून स्पष्ट केले आहे. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात 28 एप्रिल रोजी ठेवण्यात आलेल्या पुढील सुनावणीत युक्तिवाद होणार आहे.

Scroll to Top