बोलबच्चनची प्रेरणा आम्हाला पंतप्रधान मोदींकडूनच मिळाली ! संजय राऊतांचा पलटवार

मुंबई – बोलबच्चनची (Bol Bachchan)प्रेरणा आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याकडूनच मिळाली ,असा पलटवार करत शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut)यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त काल ठाकरे गटाच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणातून केलेल्या टीकेवर माध्यमांच्या प्रतिनिधींनी छेडले असता बोलबच्चन लोकांच्या बोलण्यावर मी उत्तर देत नाही,असे फडणवीस म्हणाले होते.त्यावर राऊत यांनी आज पलटवार केला.
भाजपा नेते , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांनी कालच्या मुंबई दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना कोणाची याचा परिचय महाराष्ट्राला करून दिला,अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरही राऊत यांनी कडाडून टीका केली. अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पुन्हा एकदा अपमान केला आहे. मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केला आहे. शहा महाराष्ट्राचा अपमान करत असताना त्यांच्या अवतीभवती असलेले बेईमान लोक निर्लज्जपणे टाळ्या वाजवत होते. हे चीड आणणारे आहे, असे राऊत म्हणाले.