CJP Protest : देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘नीट’ (NEET) प्रवेश परीक्षेत झालेली पेपरफुटी आणि ‘सीबीएसई’ (CBSE) परीक्षांमधील गैरप्रकारांचे पडसाद आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्रतेने उमटू लागले आहेत. या परीक्षा प्रक्रियेत समोर आलेल्या गंभीर त्रुटी आणि गोंधळाला थेट केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरत, त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. याच मागणीसाठी आता संपूर्ण देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा आक्रमक इशारा ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजित दिपके यांनी दिला आहे. मात्र, यापूर्वी देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित करण्यात आलेल्या यांच्या आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळाला न्हवता. दिल्लीतील ते आंदोलन पूर्णपणे अपयशी ठरल्यानंतर, आता या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून उद्या पुणे शहरात तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. या नियोजित आंदोलनाची सविस्तर रूपरेषा जाहीर करण्यासाठी पुणे येथे एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अभिजित दिपके यांनी ही माहिती दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना दिपके यांनी आरोप केला की, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी उघडपणे खेळत आहेत. ‘नीट’ परीक्षेतील गुणवत्तेचा दर्जा खालावला असून, पारदर्शकता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला असून जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा दावा त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना अभिजित दिपके म्हणाले की, “सध्याच्या घडीला देशातील तरुण आणि विशेषतः विद्यार्थी वर्गाचा प्रस्थापित राजकीय पक्षांवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. या राजकीय व्यवस्थेकडून आपल्या भवितव्यासाठी काही सकारात्मक घडेल, ही अपेक्षाच तरुणांनी आता सोडून दिली आहे, हे दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनातून संपूर्ण देशाला स्पष्टपणे दिसून आले आहे. जंतरमंतरचा संपूर्ण परिसर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांच्या अथांग गर्दीने फुलून गेला होता. या जनक्षोभावरून हे सिद्ध होते की, ‘सीजेपी’ हे विद्यार्थ्यांच्या हक्कांचे रक्षण करणारे आणि त्यांच्यासाठी लढणारे एक हक्काचे व भरवशाचे व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. विद्यार्थ्यांचा हाच विश्वास आमच्या आंदोलनाची खरी ताकद असून, आता या लढ्यातून कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”
आपल्या आंदोलनाची रूपरेषा मांडताना त्यांनी स्पष्ट केले की, उद्या पुणे येथे होणारे आंदोलन हे दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनापेक्षाही अधिक व्यापक आणि विराट स्वरूपाचे असेल. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाचा अधिकृत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत संपूर्ण देश पिंजून काढण्याचा ठाम निर्धार संघटनेने केला आहे. पुण्यातून सुरू होणाऱ्या या देशव्यापी आंदोलनाची व्याप्ती टप्प्याटप्प्याने वाढवली जाणार असून, पुढील काळात लखनौ, अमृतसर, जयपूर आणि बंगळुरू या देशातील प्रमुख शहरांमध्ये तीव्र निदर्शने केली जातील. या व्यापक आंदोलनानंतरही जर केंद्र सरकारने शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही, तर आगामी २० जून रोजी पुन्हा एकदा दिल्लीच्या जंतरमंतरवर संपूर्ण ताकदीनिशी ठिय्या आंदोलन सुरू केले जाईल.
पत्रकार परिषदेच्या शेवटी, परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांवर येणाऱ्या मानसिक तणावाचा उल्लेख करताना दिपके अत्यंत भावूक झाले. “अशा सदोष परीक्षा पद्धतीमुळे देशातील विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आम्ही आणखी किती वर्षे उघड्या डोळ्यांनी पाहायच्या?” असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला. तसेच देशभरातील तमाम पालकांना उद्देशून आवाहन करताना ते म्हणाले की, पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या न्याय्य हक्कांबद्दल बोलण्यापासून मुळीच रोखू नये आणि शासनाच्या कोणत्याही दडपशाहीची भीती मनात बाळगू नये. जर या आंदोलनादरम्यान सरकार अटक करणार असेल, तर सर्वात आधी मी स्वतःला कायद्याच्या स्वाधीन करून अटक करून घेईन; मात्र कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याला तडा जाऊ देणार नाही आणि त्यांना कोणताही त्रास होऊ देणार नाही, असा शब्द त्यांनी या वेळी दिला.









