person arrested in Ladda robbery case.
छत्रपती संभाजीनगर – उद्योजक संतोष लड्डा (Ladda Robbery case) यांच्या घरावर झालेल्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. अंबाजोगाई येथून अटक(arrest) करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव राजेश श्रीकृष्ण साठे (३०) आहे. त्याला छत्रपती संभाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. जाधव यांनी त्याला २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
अटक करण्यात आलेला साठे हा दरोड्यातील मुख्य आरोपी सुरेश गंगणे याचा मित्र आहे. गंगणेने दरोड्यानंतर आपल्या वाट्याला आलेले सोने साठेकडे विक्रीसाठी दिल्याची माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, साठे हा दुसरा आरोपी अमोल खोतकर याच्या संपर्कात होता. दरोड्यानंतर गंगणे व पळालेल्या सहा आरोपींसोबत साठेदेखील विविध ठिकाणी फिरत होता. साठेच्या मोबाईलमध्ये गंगणेसह इतर आरोपींशी झालेले चॅटिंग दरोड्यातील उर्वरित सोने शोधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. त्यामुळे पोलिसांनी साठेची सखोल चौकशी सुरू केली आहे. साठेवर यापूर्वीही २०१६ साली अंबाजोगाईत बलात्काराचा गुन्हा दाखल आहे, अशी माहितीही उघड झाली आहे. साठेचे वकील अॅड. प्रकाश उंटवाल यांनी न्यायालयात त्याची बाजू मांडली. मात्र न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर करत सखोल तपासास परवानगी दिली. या अटकेनंतर लड्डा दरोडा प्रकरणातील अटक आरोपींची संख्या २० वर पोहोचली आहे. पोलिसांकडून उर्वरित सोने आणि आरोपींच्या नेटवर्कचा तपास सुरू असून, लवकरच या प्रकरणातील आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे.