भारतात ‘Squid Game 3’ कधी पाहता येईल? जाणून घ्या नेटफ्लिक्सवरील रिलीजची वेळ

Squid Game Season 3

Squid Game Season 3 | जगभरात लोकप्रिय ठरलेल्या Netflix च्या ‘स्क्विड गेम’ (Squid Game) या सिरीजचा तिसरा आणि अंतिम सीझन आज, शुक्रवार, 27 जून रोजी प्रदर्शित होत आहे. हा सिझन पाहण्यासाठी जगभरातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत’गि-हून’ (Gi-hun) आणि इतर खेळाडूंचे काय होणार, या प्रश्नांची उत्तरे आता या सीझनमध्ये मिळणार आहेत.

‘स्क्विड गेम’चा पहिला सिझन सप्टेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिझनने जगभरात प्रचंड यश मिळवले. हा नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सिरीजपैकी एक बनला आणि त्याने सहा ‘प्राइमटाइम एमी अवॉर्ड्स’सह अनेक पुरस्कार जिंकले. दुसऱ्या सिझनला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या, तरी आता अंतिम सिझनकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत.

तिसऱ्या सिझनमध्ये ‘फ्रंट मॅन’ (Front Man) पुन्हा एकदा पडद्यामागे सूत्रे हलवण्यासाठी सज्ज झाला आहे. गि-हूनला ‘फ्रंट मॅन’चा खरा चेहरा समोर आणता येईल का? तर, डिटेक्टिव्ह ‘जून-हो’ (Jun-ho) या जीवघेण्या खेळांचे बेट शोधण्यात यशस्वी होईल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या अंतिम सीझनमध्ये प्रेक्षकांना मिळतील.

भारतात ‘स्क्विड गेम’ कधी आणि कुठे पाहाल?

‘स्क्विड गेम’चा तिसरा सिझन आज, 27 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. जगभरात वेगवेगळ्या वेळेनुसार हा सिझन रिलीज होत आहे. भारतातील चाहते दुपारच्या 12:30 वाजल्यापासून हा सिझन पाहू शकतात. या सिझनमध्ये एकूण 6 एपिसोड्स आहेत.

या सिझनमध्ये पुन्हा एकदा ली जंग-जेई (Lee Jung-jae), ली ब्युंग-ह्यून (Lee Byung-hun) आणि वी हा-जून यांच्यासह पार्क संग-हून, कांग हा-न्युल आणि इतर अनेक कलाकार दिसणार आहेत. या सिरीजचे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते म्हणून ह्वांग डोंग-ह्युक (Hwang Dong-hyuk) यांनीच काम पाहिले आहे.