काय हा प्रकार? थेट टॉयलेट सीटवर बसून उच्च न्यायालयाच्या सुनावणीत सहभागी झाली व्यक्ती, व्हिडिओ व्हायरल

Gujarat High Court Viral Video

Gujarat High Court Viral Video | गुजरात उच्च न्यायालयातील एका ऑनलाइन सुनावणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क बाथरूममधून सुनावणीसाठी ऑनलाइन उपस्थित राहिल्याचे दिसत आहे,

ही घटना 20 जून 2025 रोजी न्यायमूर्ती निरझर एस. देसाई यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान घडली. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

व्हिडिओमधील धक्कादायक दृश्य

व्हायरल व्हिडिओमध्ये ‘समद बॅटरी’ नावाचा व्यक्ती सुरुवातीला फक्त चेहरा दाखवताना दिसतो, त्याच्या गळ्यात ब्लूटूथ इअरफोन आहे. मात्र, काही क्षणांतच कॅमेराचा कोन बदलतो आणि तो टॉयलेटवर बसलेला दिसतो. त्यानंतर तो बाथरूममधून बाहेर पडताना दिसतो. काही वेळातच तो दुसऱ्या खोलीतून पुन्हा ऑनलाइन सुनावणीसाठी दिसू लागतो. या धक्कादायक दृश्याने नेटिझन्सना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

प्रकरण काय आहे?

‘बार अँड बेंच’च्या रिपोर्टनुसार, हा व्यक्ती एका एफआयआर रद्द करण्याच्या प्रकरणातील मूळ तक्रारदार होता आणि सुनावणीदरम्यान प्रतिवादी म्हणून हजर झाला होता. दोन्ही पक्षांनी सामोपचाराने तोडगा काढल्याचे न्यायालयाला सांगितल्यानंतर त्याचा एफआयआर रद्द करण्यात आला. मात्र, या व्यक्तीच्या बाथरूममधून सुनावणीला हजर राहण्याच्या कृतीने न्यायालयाच्या शिष्टाचारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.