विलास शिंदे यांची उबाठातून हकालपट्टी

Vilas Shinde was expelled from Ubhata party

नाशिक – नाशिकमध्ये उबाठा (Shiv Sena UBT) गटाला मोठी गळती लागली आहे. काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde) यांनी पक्षातील नाराजी व्यक्त करत शिंदे सेनेत (Shiv Sena Shinde Faction) जाण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर त्यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आले आहे. विलास शिंदे यांची जागा मामा राजवाडे यांना देण्यात आली असून, त्यांच्या नावाची घोषणा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्स पोस्ट करून केली. त्यांनी स्पष्ट केले की, ही नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने करण्यात आली आहे.

हकालपट्टीनंतर विलास शिंदे भावुक झाले. ते म्हणाले की, माझ्या भावना व्यक्त केल्या म्हणून माझ्यावर कारवाई करण्यात आली. ३० वर्ष मुलांकडे न बघता पक्षासाठी काम केले आणि आज माझ्यावर ही वेळ आली. माध्यमांशी बोललो म्हणून हकालपट्टी केली. किती जणांची अशा कारणांवरून हकालपट्टी करणार? माझ्यापेक्षा अनुभवाने कमी असलेल्यांना जिल्हाप्रमुख केले. वसंत गीते यांनी अनेक पक्ष बदलले, तरी त्यांना सगळे मिळाले. संजय राऊत यांच्याकडे नाराजी कळवली होती, त्यांनी नाशिकला आल्यावर पाहू असे सांगितले, पण त्याआधीच कारवाई झाली.