Yuzvendra Chahal: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या त्याच्या खेळापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आला आहे. २०२५ च्या सुरुवातीलाच चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला, ज्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
त्यानंतर चहलचे नाव प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आरजे महवशसोबत जोडले जाऊ लागले. मात्र, आता या कथित नात्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
इंाग्रामवर एकमेकांना केले ‘अनफॉलो’
गेल्या काही दिवसांपासून चहल आणि आरजे महवश एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. परंतु, या दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर ‘अनफॉलो’ केल्याचे समोर आले आहे. एका प्रसिद्ध पापाराझीने ही माहिती शेअर केली असून, आधी हे दोघे एकमेकांना फॉलो करत होते, पण आता त्यांच्या फॉलोईंग लिस्टमध्ये एकमेकांची नावे दिसत नाहीत. या कृतीमुळे त्यांच्यात काही बिनसले आहे की या केवळ अफवाच होत्या, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
चहलने आधीच स्पष्ट केली होती भूमिका
काही काळापूर्वी एका पॉडकास्टमध्ये बोलताना चहलने त्याच्या ‘लिंक-अप’च्या बातम्यांवर नाराजी व्यक्त केली होती. तो म्हणाला होता की, “मी माझ्या आयुष्यात कधीही पापाराझींना बोलावले नाही. एकदा मी माझ्या मित्रांसोबत बाहेर गेलो होतो, तिथे माझ्यासोबत इतरही मित्र होते. पण फोटो अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आले की जणू काही माझे कोणासोबत तरी अफेअर सुरू आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे.”
“पुन्हा प्रेमात पडायला वेळ लागेल”
सध्या कोणाशी नात्यात आहे का? असे विचारले असता चहलने स्पष्टपणे नकार दिला होता. तो म्हणाला, “लोकांना जे विचार करायचा आहे तो करू द्या. पण सध्यातरी असे काहीही नाही. पुन्हा प्रेमात पडण्यासाठी आणि त्या प्रक्रियेतून बाहेर येण्यासाठी मला स्वतःला थोडा वेळ द्यावा लागेल. सध्या मी स्वतःवर लक्ष केंद्रित करत आहे.”
चहल आणि आरजे महवश या दोघांनीही अनफॉलो करण्याच्या या प्रकारावर अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर पुन्हा एकदा चहलच्या आयुष्यात काय सुरू आहे, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.










