Ajit Pawar death : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झाले. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे विमान कोसळले. या भीषण दुर्घटनेत अजितदादांनी अखेरचा श्वास घेतला, ज्यामुळे अवघा महाराष्ट्र दुःखाच्या सागरात बुडाला आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मोठा विक्रम त्यांच्या नावावर आहे. ‘सकाळी ७ वाजता मंत्रालयात हजर होणारा मंत्री’ अशी त्यांची शिस्तबद्ध ओळख आता पर्यंत होती. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कार्यक्षम प्रशासक आणि जमिनीवरचा नेता गमावल्याचे दुःख आहे. बारामतीसह संपूर्ण पुण्यात शोकाकुल शांतता पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार आणि मुले पार्थ व जय असा परिवार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार मुंबईहून एका खासगी विमानाने बारामतीकडे जात होते. सकाळी ९:१५ च्या सुमारास धावपट्टीवर उतरत असताना विमानाला अचानक आग लागली. स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले, मात्र आगीची तीव्रता अतिकी जास्त असल्याने त्यांना वाचवता आले नाही.

अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती मिळताच सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी बारामतीकडे तातडीने प्रस्थान केले आहे. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला गेले होते. आता त्यांनी देखील तात्काळ बारामतीकडे प्रस्थान केले आहे.

अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला होता. राजकारणातील ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि प्रशासकीय पकडीसाठी अधिक ओळखले जात होते. त्यांनी १९८२ मध्ये सहकारी कारखान्यातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९९१ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीतून खासदार म्हणून निवडून आले, परंतु काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता. १९९१ पासून ते सलग बारामती विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते.
हे देखील वाचा – Ajit Pawar Death : गोपीनाथ मुंडेंनंतर अजित पवारांच्या अपघातावर संशयाच वादळ









