Home / महाराष्ट्र / Ajit Pawar : दादांची अकाली एक्झिट; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर- अजित पवारांच्या निधनाने पवार कुटुंब हादरले

Ajit Pawar : दादांची अकाली एक्झिट; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर- अजित पवारांच्या निधनाने पवार कुटुंब हादरले

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी ८ वाजून ४६...

By: Team Navakal
Ajit Pawar 
Social + WhatsApp CTA

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी एका भीषण विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. एका कर्तव्यदक्ष नेतृत्वाचा असा अनपेक्षित अंत झाल्याने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

कुटुंबीयांचा तातडीने प्रवास अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताची वार्ता समजली तेव्हा खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दिल्लीत होते. या घटनेचे वृत्त मिळताच त्यांनी तातडीने दिल्लीहून विशेष विमानाने पुण्याच्या दिशेने प्रयाण केले. पुण्यात पोहोचल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हे सर्वजण हेलिकॉप्टरने त्वरित बारामतीकडे रवाना झाले. आपल्या लाडक्या नेत्याला आणि कुटुंबप्रमुखाला गमावल्याची जाणीव या सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती.

बारामतीत शोकाकुल वातावरण हे सर्व कुटुंबीय बारामतीत दाखल झाले तेव्हा तेथील वातावरण अत्यंत हृदयद्रावक झाले होते. बारामतीचे ज्येष्ठ नेते आणि पवार कुटुंबाचे निकटवर्तीय विठ्ठलदादा मणियार यांची भेट होताच खासदार सुप्रिया सुळे यांना आपल्या भावना अनावर झाल्या. विठ्ठलदादांना पाहताच त्या त्यांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडल्या. आपल्या लाडक्या भावाच्या निधनाचे दुःख पचवणे त्यांना कठीण जात असल्याचे पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन; पंतप्रधान मोदी आणि अमित शाह अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार
एका भीषण विमान अपघातात त्यांचे निधन झाले असून, त्यांच्या पार्थिवावर उद्या, गुरुवारी सकाळी ११ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुःखद प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बारामतीत उपस्थित राहून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर-
खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार जेव्हा बारामतीत पोहोचल्या, तेव्हा तिथे त्यांचे नातेवाईक राणाजगतिसिंह पाटील उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी कौटुंबिक स्नेही विठ्ठलदादा मणियार यांची भेट घेतली. मणियार यांच्या गळ्यात पडून सुप्रिया सुळे यांना रडू कोसळले. “एकदम लाडका…” असा अजितदादांचा उल्लेख करत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या सुनेत्रा पवार यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. बहिण-भावाच्या नात्यातील हा जिव्हाळा आणि कुटुंबावर कोसळलेला हा आघात पाहून उपस्थित जनसमुदायही हेलावून गेला.

पंतप्रधानांकडून शरद पवारांचे सांत्वन-
या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फोन करून त्यांचे सांत्वन केले. राजकारणातील एका धडाडीच्या नेतृत्वाने अशा प्रकारे एक्झिट घेणे ही राज्याची मोठी हानी असल्याचे मत व्यक्त होत आहे. अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि दिग्गज नेते बारामतीकडे रवाना झाले आहेत.

अपघातातील अन्य मृतांची माहिती दुर्दैवी बाब म्हणजे, या विमान अपघातात अजित पवार यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या इतर सहकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. यामध्ये त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, विमानाचे कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि क्रू मेंबर पिंकी माळी यांचा समावेश आहे. या सर्वांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उद्या सकाळी ११ वाजता जनसागराच्या उपस्थितीत अजित पवार यांच्या पार्थिवाला अग्नी दिला जाईल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या