Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करताना झालेल्या या भीषण विमान अपघाताचा आता सखोल तपास सुरू आहे. या तपासादरम्यान, विमानाचा पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्यातील शेवटच्या क्षणांचे संभाषण समोर आले असून, त्यातून अपघातापूर्वी नक्की काय घडले असावे, याचा अंदाज वर्तवला जात आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून चार्टर्ड विमानाने बारामतीला जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.
एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि पायलटमधील शेवटचा संवाद
रिपोर्टनुसार, बुधवारी सकाळी 8:18 वाजता पायलटने बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी प्रथम संपर्क साधला. त्यावेळी नियंत्रण कक्षाने हवामान ठीक असून दृश्यमानता साधारण 3000 मीटर असल्याची माहिती दिली होती. मात्र, जेव्हा विमान धावपट्टीच्या जवळ आले, तेव्हा धुक्यामुळे पायलटला रनवे स्पष्टपणे दिसत नव्हता. यामुळे पायलटने पहिल्या प्रयत्नात लँडिंग करणे टाळले आणि विमान सुरक्षितपणे पुन्हा हवेत वर नेले.
काही वेळानंतर लँडिंगचा दुसरा प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नियंत्रण कक्षाने पायलटला विचारले की, “तुम्हाला आता धावपट्टी दिसत आहे का?” यावर पायलटने सुरुवातीला “अजून नाही” असे उत्तर दिले.
मात्र, काही क्षणांतच पायलटने अत्यंत आत्मविश्वासाने “हो, हो, आता रनवे दिसत आहे” असा संदेश दिला. या संदेशानंतर विमानाला उतरण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली, पण दुर्दैवाने विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरू शकले नाही आणि काही अंतरावरच कोसळून त्याचा मोठा स्फोट झाला.
आज बारामतीत होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11:00 वाजता बारामती येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये समर्थकांची आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात ३ दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून, राज्याच्या अनेक भागांत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेते या अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या अपघातात अजित पवारांसोबतच त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि अनुभवी पायलट्स अशा एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे.









