Ajit Pawar : बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. मात्र, आता या हा अपघात कसा झाला? याचे कारण काय होते? कामाच्या निमित्ताने अजित पवार घाईत होते का? अशा चर्चांनी आता जोर धरला आहे.
४ सभांचे नियोजन आणि मुंबईला परतण्याची घाई
मिळालेली माहिती अशी की, अजित पवार यांच्या बारामतीमध्ये एकूण 4 जाहीर सभा होणार होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी या सभांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुपे जिल्हा परिषद गटासाठी होणारी सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. अजित पवार सकाळी मुंबईहून चार्टर्ड विमानाने बारामतीला पोहोचले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना या सर्व सभा दुपारी 2 वाजेपर्यंत आटोपून तातडीने पुन्हा मुंबईला परतायचे होते. मुंबईत त्यांचे काही महत्त्वाचे शासकीय किंवा व्यावसायिक करार नियोजित होते. या करारासाठी त्यांना मुंबईत लवकरात लवकर पोहोचायचे होते आणि म्हणूनच ते विमान प्रवासादरम्यान काहीसे घाईत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
तो ‘करार’ नक्की कशाचा होता?
अजित पवार ज्या कामासाठी इतकी घाई करत होते, तो करार नक्की कशा संदर्भात होता, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, तो करार इतका महत्त्वाचा होता की, भरगच्च सभांचे नियोजन असूनही त्यांनी त्याच दिवशी मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला होता. हा करार राज्याच्या हिताचा एखादा मोठा प्रकल्प होता की आणखी काही? यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
विमान लँडिंग होत असताना झालेला अपघात इतका भीषण होता की विमान जळून खाक झाले. अपघातानंतर अजित पवारांजवळील कामांसंबंधी कागदपत्रांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.
घाई ठरली का अपघाताचे कारण?
विमान वाहतुकीच्या नियमांनुसार, लँडिंगच्या वेळी हवामान आणि दृश्यमानता तपासणे अनिवार्य असते. बारामतीत लँडिंग करताना धुक्याची चादर होती आणि अशा वेळी लवकरात लवकर सभा आटोपण्याच्या दबावाखाली वैमानिकाने किंवा प्रशासकीय यंत्रणेने घाई केली का, हा तपासाचा मुख्य विषय आहे. जर तो करार इतका महत्त्वाचा नसता, तर कदाचित अजित पवार यांनी थोडा वेळ थांबून किंवा हवामान स्वच्छ झाल्यावर प्रवास केला असता का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
कमी दृश्यमानता आणि वैमानिकांची भूमिका
अपघाताच्या वेळी बारामती विमानतळ परिसरात दाट धुके होते. हवाई वाहतुकीच्या नियमांनुसार (Aviation Protocol), जर धावपट्टी स्पष्ट दिसत नसेल, तर वैमानिकाने लँडिंगचा प्रयत्न टाळणे अपेक्षित असते.
- दृश्यमानतेचे आव्हान: धुक्यामुळे ‘व्हिजिबिलिटी’ खूपच कमी होती. अशा परिस्थितीत लँडिंग करणे अत्यंत धोकादायक असते.
- वैमानिकाची चूक की दबाव?: कॅप्टन सुमित कपूर हे अनेक तासांचा अनुभव असलेले वैमानिक होते. इतका प्रदीर्घ अनुभव असतानाही त्यांनी कमी दृश्यमानतेत लँडिंगचा धोका का पत्करला? ‘व्हीआयपी’ प्रवाशाची घाई किंवा नियोजित वेळेचे पालन करण्याच्या दबावापोटी वैमानिकाने प्रोटोकॉल बाजूला ठेवला का, याचा आता तपास सुरू आहे.
प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले का?
विमान लँडिंग करण्यापूर्वी एअर ट्रॅफिक कंट्रोलरने हवामानाची पूर्वकल्पना दिली होती. पहिल्या प्रयत्नात लँडिंग न झाल्याने वैमानिकाने विमान पुन्हा हवेत नेले होते. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात ‘रनवे दिसतोय’ असे सांगत लँडिंग करताना विमानाचा ताबा सुटला. तज्ज्ञांच्या मते, जर दृश्यमानता मानकांपेक्षा कमी असेल, तर विमानाला जवळच्या दुसऱ्या विमानतळावर (Divert) वळवणे हा सुरक्षित प्रोटोकॉल असतो. बारामतीत तो का पाळला गेला नाही, हे ब्लॅक बॉक्सच्या तपासणीनंतरच स्पष्ट होईल का?











