UPSC Notification 2026: आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा २०२६ साठीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ९३३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून ती २४ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
परीक्षेचे वेळापत्रक आणि महत्त्वाच्या तारखा
यूपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, यंदाची पूर्व परीक्षा २४ मे २०२६ रोजी आयोजित केली जाणार आहे. जे उमेदवार पूर्व परीक्षेत यशस्वी होतील, त्यांची मुख्य परीक्षा २१ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होईल. वयाची पात्रता ठरवण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ ही तारीख आधार मानली जाईल.
पात्रता आणि वयोमर्यादा
- शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (ग्रेज्युएशन) असणे अनिवार्य आहे.
- वयोमर्यादा: उमेदवाराचे वय २१ ते ३२ वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
- अर्ज शुल्क: सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये शुल्क आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), महिला आणि दिव्यांग उमेदवारांना अर्जासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
निवड प्रक्रिया आणि हॉल तिकीट
यूपीएससीची निवड प्रक्रिया तीन मुख्य टप्प्यांत पार पडते. सर्वात आधी पूर्व परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा आणि शेवटी मुलाखत घेतली जाते. या सर्व टप्प्यांनंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी केली जाते.
यशस्वीरीत्या अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या एक आठवडा आधी अधिकृत वेबसाईटवरून आपले ई-प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोड करता येईल.
असा करा अर्ज (Step-by-Step Process)
१. सर्वप्रथम यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला (upsconline.nic.in) भेट द्या.
२. तिथे ‘वन टाइम रजिस्ट्रेशन’ (OTR) प्रक्रिया पूर्ण करा.
३. वैयक्तिक, शैक्षणिक आणि संपर्क तपशील अचूक भरा.
४. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
५. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करा.
६. फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
परीक्षेच्या दिवशी उमेदवारांनी केंद्रावर ३० मिनिटे आधी पोहोचणे अनिवार्य आहे, अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही. तसेच हॉल तिकीटसोबत अधिकृत ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे.









