Viral Video : दैनंदिन जीवनात आपण स्विगी, झोमॅटो किंवा ब्लिंकइट सारख्या विविध ऑनलाइन सेवांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. याच श्रेणीतील ‘पोर्टर’ (Porter) हे अॅप प्रामुख्याने जड वस्तू किंवा पार्सल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी ओळखले जाते. या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या मालवाहतुकीची सोय उपलब्ध झाली आहे. मात्र, तंत्रज्ञानाचा आणि सुविधेचा वापर कशा प्रकारे चुकीच्या कारणांसाठी केला जाऊ शकतो, याचे एक धक्कादायक उदाहरण उत्तर प्रदेशातील लखनौ शहरातून समोर आले आहे.
लखनौमधील विचित्र प्रकार-
‘नवाबांचे शहर’ म्हणून ओळखले जाणाऱ्या लखनौमध्ये नागरिकांची सभ्यता आणि आदरयुक्त वागणूक नेहमीच चर्चेचा विषय असते. परंतु, याच शहरात एका महिलेने ‘पोर्टर’ सेवेचा जो वापर केला, त्याने सर्वांनाच थक्क केले आहे. या महिलेने चक्क घरातील कचरा फेकण्यासाठी या व्यावसायिक अॅपचा वापर केला. यासंदर्भातील एक चित्रफीत (व्हिडिओ) सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड वेगाने प्रसारित होत असून, त्यावरून नेटिझन्समध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने पोर्टर अॅपवरून डिलिव्हरी पार्टनरला बोलावून घेतले. जेव्हा तो कर्मचारी घरी पोहोचला, तेव्हा पार्सलऐवजी त्याच्या हातात कचऱ्याची पिशवी सोपवण्यात आली. व्यावसायिक कामासाठी आणि महत्त्वाच्या वस्तूंच्या ने-आण करण्यासाठी असलेल्या या सेवेचा उपयोग अशा तुच्छ कामासाठी केल्यामुळे त्या कर्मचाऱ्याची आणि सेवेची थट्टा उडवण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे. सुविधेचा असा अजब आणि अनाठायी वापर पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
पार्सलच्या नावाखाली कचऱ्याची डिलिव्हरी –
या घटनेच्या तपशिलानुसार, संबंधित महिलेने पोर्टर अॅपवरून एक पार्सल पोहोचवण्यासाठी नोंदणी केली होती. रायडर जेव्हा तिच्या घरी पोहोचला, तेव्हा तिने नियमानुसार एक पाकीट त्याच्या स्वाधीन केले आणि त्याचे ऑनलाइन शुल्क आधीच भरले असल्याचे सांगितले. सुरुवातीला सर्व काही अधिकृत वाटत असल्यामुळे तो रायडर पार्सल घेऊन इच्छित स्थळी पोहोचला. मात्र, तिथे पोहोचल्यावर कोणाला संपर्क साधायचा, हे विचारण्यासाठी त्याने जेव्हा महिलेला भ्रमणध्वनीवरून संपर्क केला, तेव्हा तिने दिलेले उत्तर ऐकून त्याला धक्काच बसला. ती महिला अत्यंत सहजपणे म्हणाली, “भैया, ते पार्सल कोणाला द्यायचे नाहीये, तो कचरा आहे, तुम्ही तो कुठेही फेकून द्या.”
https://www.instagram.com/reel/DUS9ld0kadx/?utm_source=ig_web_button_share_sheet
डिलिव्हरी रायडरचा संताप-
महिलेचे उत्तर ऐकल्यानंतर रायडरने जेव्हा ते पार्सल उघडून पाहिले, तेव्हा त्यात खरोखरच घरातील कचरा भरलेला आढळला. केवळ काही रुपयांच्या मोबदल्यात एखाद्या कष्टकरी व्यक्तीला आपला कचरा फेकायला लावणे, ही बाब त्या कर्मचाऱ्याला अत्यंत अपमानास्पद वाटली. त्याने या संपूर्ण प्रकरणाचे चित्रीकरण केले आणि ते समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले. “आम्ही वस्तू पोहोचवण्याचे काम करतो, कोणाचा कचरा उचलण्याचे नाही,” अशा शब्दांत त्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर टीकेची झोड-
हा व्हिडिओ व्हायरल होताच इंटरनेटवर संतापाची लाट उसळली आहे. “सुविधा मिळतात याचा अर्थ असा नाही की कोणाच्याही श्रमाचा असा अवमान करावा,” अशी भूमिका नेटीझन्सनी घेतली आहे. अनेकांनी या महिलेच्या वागणुकीला ‘विकृत नजाकत’ म्हटले असून, अशा ग्राहकांवर संबंधित कंपनीने कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे. केवळ आर्थिक सक्षमता असल्यामुळे कोणालाही आपली खासगी कामे किंवा घाण साफ करायला सांगणे, हे मानवी मूल्यांच्या विरोधात असल्याचे मत व्यक्त होत आहे.









