Bharat Taxi Launch: भारतातील टॅक्सी व्यवसायात आता क्रांती होणार आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी ‘भारत टॅक्सी’ या देशातील पहिल्या सहकारी तत्त्वावर आधारित टॅक्सी सेवेचे लोकार्पण केले. गेल्या दोन महिन्यांपासून या सेवेची यशस्वी चाचणी सुरू होती. आता ही सेवा ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या मोठ्या कंपन्यांना थेट आव्हान देण्यासाठी सज्ज झाली आहे.
काय आहे ‘भारत टॅक्सी’?
‘भारत टॅक्सी’ ही जगातील पहिली आणि सर्वात मोठी सहकारी आधारित राईड-हेलिंग प्रणाली असल्याचा दावा सहकार मंत्रालयाने केला आहे. मल्टि-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट अंतर्गत ६ जून २०२५ रोजी याची नोंदणी करण्यात आली होती.
८ मोठ्या सहकारी संस्थांच्या पाठिंब्याने हा प्लॅटफॉर्म उभा राहिला असून, दिल्ली-एनसीआर आणि गुजरातमध्ये याची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाली आहे. पुढील २ वर्षांत संपूर्ण देशात ही सेवा विस्तारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
‘सारथी ही मालक’ संकल्पना
या प्लॅटफॉर्मचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘सारथी ही मालक’ (ड्रायव्हरच मालक) हे तत्व. यामध्ये ड्रायव्हर्सना केवळ कर्मचारी न मानता त्यांना सहकारी सदस्य म्हणून स्थान दिले जाते.
- नोंदणी: आतापर्यंत ३ लाख ड्रायव्हर्सनी यावर नोंदणी केली आहे.
- वापरकर्ते: १ लाखांहून अधिक प्रवाशांनी ॲप डाऊनलोड केले आहे.
- कमाई: चाचणी कालावधीत ड्रायव्हर्सनी १० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
- विमा सुविधा: आजच्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ६ सारथींचा सन्मान केला जाणार असून त्यांना ५ लाख रुपयांचा अपघात विमा आणि ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे.
ड्रायव्हर्स आणि प्रवाशांसाठी फायदे
१. सामाजिक सुरक्षा: ड्रायव्हर्सना आरोग्य विमा, निवृत्ती वेतन बचत आणि अपघात विम्याचे संरक्षण मिळेल.
२. स्वातंत्र्य: ड्रायव्हर्सवर कोणत्याही एकाच प्लॅटफॉर्मवर काम करण्याचे बंधन नसेल.
३. सुरक्षा: प्रवाशांसाठी आपत्कालीन मदत प्रणाली आणि पडताळणी केलेला डेटा उपलब्ध असेल.
४. सेवा केंद्रे: सध्या दिल्लीत ७ सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
या प्लॅटफॉर्ममुळे ड्रायव्हर्सची होणारी आर्थिक पिळवणूक थांबण्यास मदत होईल आणि प्रवाशांना वाजवी दरात प्रवास करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









