Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहराच्या हृदयस्थानी असलेल्या क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागेश्वरवाडी परिसरातून एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रकार समोर आला आहे. ३१ जानेवारी रोजी पहाटे ३:२७ वाजेच्या सुमारास एका स्थानिक दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, एक तरुण एका तरुणीला निर्जन रस्त्यावरून जबरदस्तीने ओढत नेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ती तरुणी स्वतःला सोडवून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होती, मात्र तो तरुण तिला खेचत राहिला. सुमारे १० ते १५ मिनिटे हा थरार सुरू होता. सुदैवाने, एका जागरूक नागरिकाने आपल्या खिडकीतून आवाज दिल्याने हा प्रकार थांबला आणि त्यानंतर ते दोघेही तिथून निघून गेले.
या घटनेमुळे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अद्याप या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही, तसेच संबंधित तरुण-तरुणींची ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांना या घटनेची माहिती मिळूनही प्राथमिक स्तरावर ठोस पावले उचलली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान याचप्रकारची घटना पुण्यात देखील घडली होती. विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात मैत्रीला काळिमा फासणारी एक भयंकर घटना २ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कात्रज परिसरात घडली. जुन्या मैत्रिणीला फोन करण्याच्या कारणावरून आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण या दोन मित्रांमध्ये शाब्दिक चकमक झाली. वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. “तुझ्यामुळे माझे ब्रेकअप झाले,” असा आरोप करत रागाच्या भरात आदित्यने जवळच असलेल्या एका रसवंती गृहातील कोयता उचलला आणि चेतनवर सपासप वार केले.
या भीषण हल्ल्यात चेतन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण समोर आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी आदित्य कांबळे याला अटक केली असून, पुढील कायदेशीर तपास सुरू आहे. या दोन्ही घटनांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, वाढत्या रागावर नियंत्रण मिळवणे ही सामाजिक गरज बनली आहे.









