New Expressway Project: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर दोन दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटल्याने तब्बल 22 तास वाहतूक विस्कळीत झाली होती. या वारंवार होणाऱ्या कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईकडे येणाऱ्या जड वाहनांसाठी ‘शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत’ या नव्या हायवेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जाणार आहे.
एक्स्प्रेसवेवरील भार कसा कमी होणार?
सध्या मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरहून येणारी बहुतांश वाहने चाकण-तळेगावमार्गे लोणावळ्यातून एक्स्प्रेसवेवर येतात. यामुळे खंडाळा घाटात वाहनांची मोठी गर्दी होऊन कोंडी निर्माण होते. नव्या शिरूर-कर्जत महामार्गामुळे ही जड वाहतूक थेट कर्जतला पोहोचेल. परिणामी, एक्स्प्रेसवेवरील वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊन प्रवाशांचा मनस्ताप थांबणार आहे.
प्रकल्पाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये:
हा नवा महामार्ग आधुनिक ‘मल्टिमोडल कॉरिडॉर’ म्हणून विकसित केला जाणार आहे. याची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- एकूण लांबी: या महामार्गाची एकूण लांबी 135 किमी असेल.
- दोन टप्पे: पहिल्या टप्प्यात 60 किमी आणि दुसऱ्या टप्प्यात 75 किमीचे काम केले जाईल.
- पायाभूत सुविधा: प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी या मार्गावर 5 बोगदे, 6 मोठे पूल आणि 48 लहान पुलांचे बांधकाम प्रस्तावित आहे.
- खर्च: या प्रकल्पासाठी सुमारे 12,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
औद्योगिक पट्ट्याला मोठा फायदा
या नव्या मार्गामुळे केवळ मुंबई-पुणे अंतर कमी होणार नाही, तर चाकण, तळेगाव आणि शिक्रापूर या औद्योगिक पट्ट्यातील अवजड वाहनांना बाहेरून मार्ग मिळेल. यामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल.
मराठवाड्यातून येणारी जड वाहतूक आता शिरूर-खेड मार्गे थेट मुंबईच्या दिशेने वळवली जाणार असल्याने खंडाळा घाट आणि लोणावळा परिसरातील प्रवासाचा वेग वाढणार आहे.









