Home / महाराष्ट्र / Rohit Pawar and Ajit Pawar : अजितदादांचा अपघात की घातपात? रोहित पवार १० फेब्रुवारीला करणार मोठा खुलासा; विलीनीकरणाच गुपितही येणार बाहेर

Rohit Pawar and Ajit Pawar : अजितदादांचा अपघात की घातपात? रोहित पवार १० फेब्रुवारीला करणार मोठा खुलासा; विलीनीकरणाच गुपितही येणार बाहेर

Rohit Pawar and Ajit Pawar : संपूर्ण पवार कुटुंबियांनी पुन्हा एकदा एकत्र यावे, ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मनापासूनची इच्छा...

By: Team Navakal
Rohit Pawar and Ajit Pawar
Social + WhatsApp CTA

Rohit Pawar and Ajit Pawar : संपूर्ण पवार कुटुंबियांनी पुन्हा एकदा एकत्र यावे, ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मनापासूनची इच्छा होती. अजितदादांचे राजकीय वलय आणि त्यांचे कार्य पाहता, त्यांची पोकळी भरून काढणे कोणालाही शक्य नाही. मात्र, एक कुटुंब म्हणून मी सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांचेच प्रतिबिंब पाहतो, असे भावूक उद्गार आमदार रोहित पवार यांनी काढले. बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

रोहित पवार पुढे म्हणाले की, अजितदादांकडे असलेली उपमुख्यमंत्रीपदाची धुरा आणि त्यांच्या अखत्यारीतील सर्व महत्त्वाची खाती सुनेत्रा वहिनींना मिळावीत, अशी आमची सुरुवातीपासूनची धारणा होती. दादांनी प्रदीर्घ काळ जनसेवेचा जो वारसा चालवला आहे, तोच वारसा सुनेत्रा काकी समर्थपणे पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केवळ सत्तेची पदेच नव्हे, तर आता सुनेत्रा वहिनींनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही स्वीकारायला हवी, अशी आग्रही मागणी रोहित पवार यांनी यावेळी केली.

कौटुंबिक एकोपा आणि पक्षाचे भवितव्य या दोन्ही दृष्टीकोनातून सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असे संकेत रोहित पवारांच्या या विधानातून मिळत आहेत. बारामतीच्या राजकारणात आणि पवार कुटुंबियांच्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी केलेले हे विधान सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. दादांच्या अनुपस्थितीत कुटुंबाची आणि पक्षाची वीण घट्ट ठेवण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी पुढाकार घ्यावा, अशीच भावना कार्यकर्त्यांमध्येही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘पवार कुटुंबियांचे ऐक्य हेच अजितदादांचे स्वप्न’; रोहित पवारांनी व्यक्त केल्या भावना-
“पवार परिवारातील सर्व सदस्यांनी मतभेद विसरून एकत्र यावे, ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अंतःकरणपूर्वक इच्छा होती. त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्नही केले. केवळ दादाच नव्हे, तर आदरणीय शरद पवार साहेब, सुप्रिया ताई आणि आम्ही सर्वजण कुटुंब पुन्हा एकसंध व्हावे यासाठी प्रयत्नशील होतो,” असे भावूक उद्गार आमदार रोहित पवार यांनी काढले. बारामती येथील काटेवाडीत मतदान प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अजितदादांच्या निधनानंतर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगात गेल्या १३ दिवसांपासून संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आहे. कौटुंबिक एकोपा जपण्याच्या दादांच्या ध्येयाचा पुनरुच्चार करताना रोहित पवार म्हणाले की, आज काटेवाडीत श्रीनिवास पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांचे एकत्रितपणे मतदानासाठी येणे, हे कोणत्याही नियोजित कार्यक्रमाचा भाग नसून कुटुंबातील नैसर्गिक बंधाचे प्रतीक आहे. दादांचे जे स्वप्न होते, त्याची प्रचिती आज या निमित्ताने सर्वांना येत आहे.

याप्रसंगी त्यांनी काल संध्याकाळी आदरणीय शरद पवार यांच्यासोबत झालेल्या विशेष बैठकीची माहितीही दिली. “पवार साहेबांनी जय पवार यांच्यासह आम्हा सर्व युवा सदस्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावनिक होते. आगामी काळात अजितदादांच्या स्मृती प्रज्वलित ठेवण्यासाठी कोणत्या सामाजिक आणि विधायक गोष्टी कराव्या लागतील, यावर साहेबांनी चर्चा केली. साहेबांच्या मनात जेव्हा एखाद्या कार्याची संकल्पना येते, तेव्हा ते आम्हा सर्वांना बोलावून घेऊन योग्य दिशा दाखवतात,” असेही रोहित पवार यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर सूचक मौन बाळगले असले, तरी आगामी काळात दोन मोठ्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून खळबळजनक वास्तव मांडण्याचे संकेत दिले आहेत. बारामती जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

रोहित पवार म्हणाले की, “सध्या आमचे संपूर्ण कुटुंब अजितदादांच्या जाण्याने अत्यंत धक्क्यात आहे. गेल्या १३ दिवसांत आम्ही केवळ कौटुंबिक भावनांना प्राधान्य दिले असून, कुटुंबात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. ९ फेब्रुवारीपर्यंत सुतकाचा काळ असल्याने आम्ही राजकारणापासून दूर होतो. मात्र, १० फेब्रुवारीला मी स्वतः अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात माझ्या मनात असलेल्या काही गंभीर शंका जनमानसात उपस्थित करणार आहे. त्या दिवशी या प्रकरणातील काही तांत्रिक आणि संशयास्पद बाबींवर मी भाष्य करेन.”

विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अधिक स्पष्टता देताना रोहित पवारांनी सांगितले की, “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत नेमकी काय चर्चा झाली होती आणि त्यामागे दादांची तसेच आमची नेमकी काय भूमिका होती, हे मी १२ फेब्रुवारीला मुंबईत होणाऱ्या पत्रकार परिषदेत पुराव्यासह मांडणार आहे. आम्ही विलीनीकरणाच्या निर्णयाप्रत का आलो होतो आणि त्या प्रक्रियेत नेमके काय ठरले होते, याची ‘इनसाईड स्टोरी’ मी सर्वांसमोर आणणार आहे.”

प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सध्याच्या भूमिकेवर विचारले असता, त्यांनी थेट बोलणे टाळले. “सध्या राजकीय चिखलफेक करण्याची ही वेळ नाही, परंतु सत्याचा उलगडा होणे गरजेचे आहे. ९ फेब्रुवारीनंतर पवार कुटुंब या धक्क्यातून सावरून राजकीय विचारांना सुरुवात करेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवारांच्या या विधानांमुळे १० आणि १२ फेब्रुवारीला होणाऱ्या त्यांच्या पत्रकार परिषदांकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा – HSRP Number Plate : वाहनधारकांनो सावधान! १८ फेब्रुवारीपासून जुन्या नंबर प्लेटस असलेल्या वाहनांवर कारवाई

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या