Home / महाराष्ट्र / Rain : मुंबई, पालघरला रेड अलर्ट! वाहतूक कोलमडली ! नालेसफाई पाण्यात! पेणच्या गणेशमूर्ती भिजल्या

Rain : मुंबई, पालघरला रेड अलर्ट! वाहतूक कोलमडली ! नालेसफाई पाण्यात! पेणच्या गणेशमूर्ती भिजल्या

Rain : महाराष्ट्रात पंधरा दिवस उशिराने दाखल झालेल्या मोसमी पावसाने आज पहिल्याच दमदार हजेरीत मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Rain : महाराष्ट्रात पंधरा दिवस उशिराने दाखल झालेल्या मोसमी पावसाने आज पहिल्याच दमदार हजेरीत मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना झोडपून काढले. या पावसामुळे अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले, रस्ते तुंबले, झाडे कोसळली, वाहतूक विस्कळीत झाली. पेण तालुक्यातील एका गणेशमूर्ती कारखान्यात पाणी शिरल्याने शेकडो गणेशमूर्तींचे नुकसान झाले. पहिल्याच पावसाने याप्रकारे नालेसफाई आणि इतर उपाययोजनांचा पूर्ण बोजवारा उडवला. मात्र  सत्ताधारी आणि विरोधकांनी यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांपेक्षा त्यांना याचे राजकारण करण्यातच रस असल्याचे दाखवून दिले.


कोकणच्या सीमेवर अडकलेला मोसमी पाऊस गेल्या दोन दिवसांत वेगाने वाटचाल करत संपूर्ण राज्यात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, पुढील तीन दिवस कोकणासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. खास करून पुढील 48 ते 72 तास कोकण, मुंबई महानगर क्षेत्र आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


गेल्या दोन दिवसांत जून महिन्याच्या सरासरी पावसाच्या तब्बल 52 टक्के पाऊस राज्यात झाल्याचे हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले.  विजांचा कडकडाट, ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि जोरदार सरींमुळे आज राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाची रिपरिप चालू होती. रात्री 11 ते पहाटे 3 या पाच तासांत पडलेल्या पावसामुळे  मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले. दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, अंधेरी, किंग्ज सर्कल, मालाड, धारावी आणि इतर सखल भागांमध्ये पाणी साचले. दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानक परिसरात रुळांवर पाणी साचल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यामुळे हजारो प्रवाशांना स्थानकांवर खोळंबून राहावे लागले. पहिल्याच पावसात अंधेरी सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी भरल्याने तो तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.  पवई परिसरात रस्ता खचल्याची घटना घडली. किंग्ज सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने ठाण्याकडे जाणारी वाहतूक मंदावली.

या भागात एक बेस्ट बस बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत होण्यात आणखी भर पडली. कांदिवली पूर्वेतील हनुमान नगरमधील राधाकृष्ण सोसायटीसह अनेक घरांमध्ये पाणी शिरले. दादर पूर्वेतील स्वामीनारायण मंदिराजवळ रात्री एका कारवर झाड कोसळल्याची घटना घडली. यात कारमध्ये झोपलेला चालक जखमी झाला. विक्रोळी पश्चिमेतील जेव्हीएलआर मार्गावरील सनसिटी कॉम्प्लेक्स आणि सनहाईट्स इमारतीलगत असलेली सुमारे 50 मीटर लांबीची संरक्षक भिंत रात्री दीड वाजताच्या सुमारास कोसळली. गोरेगावच्या आरे कॉलनी परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आरे कॉलनी ते मरोळ नाका आणि पवईकडे जाणार्‍या मुख्य मार्गावर एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरही अशीच वाहतूक कोंडी झाली. पावसाचे पाणी साचले असतानाच दादर आणि अंधेरी सबवेजवळ मॅनहोल उघडी असल्याचे आढळल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. नंतर पालिकेने घाईघाईने त्यावर झाकणे बसवली. पावसाचा कहर चालू असताना पेडर रोडवरील रस्त्यावर मोर फिरताना दिसले.


पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधार्‍यांवर टीकेचा वर्षांव केला. उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपा आणि महापौर यांना कधी मुंबईची काळजी नव्हतीच. त्यांना केवळ कंत्राटदार आणि बिल्डरांची काळजी आहे. पण ज्यांच्याबद्दल तुम्हाला इतकी काळजी आहे, त्यांनी कामे  कशी केली, याची तरी किमान काळजी घ्यायला हवी होती. माजी महापौर आणि उबाठा नगरसेविका किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, यांना मुंबई सांभाळता येत नाही. आमच्या काळात टीका करणार्‍यांनी आता लढायच्या आधीच तलवारी म्यान केल्या आहेत. यांनी गाळ काढलाच नाही. कारण यांना ते करायचेच नाही. मुंबईला उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.


तर उबाठाचे आमदार सचिन अहिर म्हणाले की, सत्ताधार्‍यांकडे सगळे आहे, तरी त्यांनी मुंबईला पाण्यात टाकले. उबाठाचे दुसरे आमदार महेश सावंत म्हणाले की, रिमझिम पाऊस पडला तरी ही स्थिती आहे. 26 जुलैसारखा पाऊस पडला तर काय होईल? तर आ. बाळा नर म्हणाले की, किती नालेसफाई झाली ते यावरून कळते. केवळ ठेकेदारांची पाठराखण झालेली आहे. आम्ही सूचना केल्या त्याप्रमाणे काम केले असते तर अशी परिस्थिती आली नसती.
या टीकेला उत्तर देताना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत म्हणाले की, 25 वर्षे यांनी काम केले असते तर अशी स्थिती आली नसती. मिठीच्या गाळात गैरव्यवहार करणार्‍यांनी आम्हाला सल्ला देऊ नये. महायुतीची पालिका मुंबईकरांच्या समस्या सोडवायला सक्षम आहे.
मुंबईप्रमाणे ठाण्यातही काल रात्रीपासून पाऊस सुरू होता. पाचपाखाडी परिसरात एका हॉटेलच्या छतावर झाड कोसळले. मुसळधार पावसामुळे वाशी-ठाणे ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर कोपरखैरणे ते घणसोलीदरम्यान रुळाखालची माती वाहून गेली. त्यामुळे ट्रान्सहार्बर मार्गावरील दोन्ही रेल्वे मार्गिका सुमारे तासभर बंद ठेवाव्या लागल्या. परिणामी कार्यालयात जाणार्‍या कर्मचार्‍यांचे हाल झाले. वसई-विरार परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नालासोपारा स्थानक परिसर, सेंट्रल पार्क, तुळींज, गाळा नगर, आचोळे रोड आणि अनेक सखल भागांत पाणी साचले. राजोडी, उमराळा आणि दिवाणमान परिसरात झाडे कोसळल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. नवी मुंबईतील कोपरखैरणे, तुर्भे, पनवेल आणि उलवे परिसरातही रस्त्यांवर पाणी साचले.


रायगड जिल्ह्यातील मुरुड, तळा, पेण, म्हसळा, सुधागड, अलिबाग, उरण आणि पनवेल तालुक्यांना पावसाने जोरदार तडाखा दिला. पेण तालुक्यातील कळवा गावातील गणेशमूर्ती कारखान्यात अचानक पावसाचे पाणी शिरल्याने शेकडो गणेशमूर्ती भिजून खराब झाल्या. नाल्याचे पाणी उलट दिशेने वाहत कारखान्यात शिरले. त्यामुळे काही मिनिटांतच कारखान्यात गुडघाभर पाणी साचून शेकडो गणेशमूर्ती भिजल्या. यामुळे कारखानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पेण तालुक्यात 24 तासांत 160 मिमी, तळा तालुक्यात 174 मिमी, तर म्हसळा तालुक्यात 173 मिमी पावसाची नोंद झाली. किल्ले रायगडावर जाणार्‍या पायरी मार्गावर दरड कोसळली. तर अलिबाग तालुक्यातील देहेन गावात पूरस्थिती निर्माण झाली. तिथे एक पूलही वाहून गेला,  मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चोळईजवळ मातीचा ढिगारा महामार्गावर आल्याने काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती.


पुण्यातही मान्सूनने दमदार हजेरी लावली. नसरापूर-राजगड मार्गावरील शिवगंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथे देशातील सर्वाधिक 174 मिमी पावसाची नोंद झाली. कोयना धरण परिसरात 71 मिमी तर नवजा येथे 52 मिमी पाऊस झाला. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खुडाणे गावाजवळ विजेच्या झटक्याने मेंढ्यांच्या कळपातील तब्बल 40 मेंढ्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज कोसळून राकेश पाटील या तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाला. मुक्ताईनगर तालुक्यात केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अमळनेर शहरातील नाले तुडुंब भरल्याने खराब पाणी रस्त्यांवर आले. रेल्वे बोगद्यांमध्येही पाणी साचले. वाशिम जिल्ह्यातील वनोजा येथे पपई उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान झाले. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, शेगाव आणि चिखली तालुक्यांत अनेक नद्या व ओढ्यांना पूर आला. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे घरांमध्ये पाणी शिरले. यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यांतही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला असून समुद्रकिनारी जाणे टाळण्याचे आवाहन
केले आहे.

मॅनहोलमध्ये पालिका अधिकारी
महापौरांसमोरच सुरक्षा खड्ड्यात

मुंबईच्या महापौर रितू तावडे या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करत असताना माटुंगा येथील गांधी नगर परिसरात त्यांच्या समोरच बृहन्मुंबई महापालिकेचा एक अधिकारी उघड्या मॅनहोलमध्ये पडला. सुदैवाने उपस्थित नागरिक आणि सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. मुंबईत अनेक ठिकाणी मॅनहोल उघडी असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर शहरात उघडे मॅनहोल ठेवणार्‍या संबंधित कंत्राटदार आणि दोषी अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाला दिले होते. हे आदेश दिल्यानंतर काही तासांतच त्यांच्याच उपस्थितीतच हा प्रकार घडला. गांधी नगर परिसरात पावसाळी परिस्थिती आणि पाणी उपशाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापौर अधिकार्‍यांच्या ताफ्यासह गेल्या होत्या. त्यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाहणीदरम्यान महापौरांच्या समोरून चालत जाताना एका पालिका अधिकार्‍याचा पाय उघड्या मॅनहोलमध्ये गेला. या घटनेमुळे मुंबईतील पावसाळी पूर्वतयारी आणि सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या