Home / महाराष्ट्र / Sanjay Raut Criticises RSS : सेलिब्रिटींच्या उपस्थितीवरून संजय राऊतांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका..

Sanjay Raut Criticises RSS : सेलिब्रिटींच्या उपस्थितीवरून संजय राऊतांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका..

Sanjay Raut Criticises RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित ‘नवे क्षितिज’ या विशेष व्याख्यानमालेतील...

By: Team Navakal
Sanjay Raut Criticises RSS
Social + WhatsApp CTA

Sanjay Raut Criticises RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित ‘नवे क्षितिज’ या विशेष व्याख्यानमालेतील अतिथींच्या निवडीवरून नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. नागपूर येथे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला बॉलिवूड अभिनेता सलमान खान, गायक अदनान सामी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी हजेरी लावली होती. या सेलिब्रिटींच्या उपस्थितीवरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी संघाच्या ‘राष्ट्रभक्ती’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीकेची झोड उठवली आहे.

अदनान सामी यांच्या उपस्थितीवरून ‘इतिहासा’चे दाखले-
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी गायक अदनान सामी यांच्या उपस्थितीवर कडक शब्दांत आक्षेप घेतला. ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष आणि संघाची राष्ट्रभक्ती किती ढोंगी आहे, हे या कार्यक्रमातून जगासमोर आले आहे. ज्या अदनान सामींचे वडील अर्शद खान यांनी १९६५ च्या भारत-पाक युद्धादरम्यान पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रतिनिधित्व करत पठाणकोट तळावर बॉम्बफेक केली होती, तेच अदनान सामी सरसंघचालकांच्या बाजूला बसून न्याहारी करत होते. संघाच्या विचारवंतांना आणि संयोजकांना हा इतिहास ठाऊक नव्हता का? भारतावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या वारसांना सन्मान देऊन संघ कोणती प्रेरणा देऊ पाहत आहे?” असा टोकदार सवाल राऊत यांनी विचारला.

शिल्पा शेट्टी आणि ‘आर्थिक गैरव्यवहारां’चा संदर्भ-
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्यावरही राऊत यांनी निशाणा साधला. “एक अभिनेत्री तिथे उभी राहून ‘आय लव्ह भागवत’ म्हणत होती, मात्र तिच्यावर आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर तिच्या पतीवर अश्लील चित्रपट निर्मितीचा गंभीर गुन्हा दाखल आहे. अशा संशयास्पद पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना बोलावून संघ आपल्या चारित्र्याचे कोणते दर्शन घडवत आहे?” अशी विचारणा त्यांनी केली. बँकेचे कर्ज बुडवणारे आणि कायद्याचा ससेमिरा पाठीशी असणारे लोक संघाच्या व्यासपीठावर उपस्थित राहून आपल्या पापांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रतिष्ठित विचारवंतांना डावलल्याचा दावा-
संजय राऊत यांनी यावेळी जावेद अख्तर आणि शाहरुख खान यांना आमंत्रण न दिल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, “जावेद अख्तर यांचे काका स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, तरीही त्यांना बोलावले गेले नाही. शाहरुख खानचे आजोबा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत सेनापती होते, पण त्यांनाही निमंत्रण नव्हते. संघाच्या दृष्टीने हे खरे राष्ट्रभक्त कदाचित महत्त्वाचे नसावेत.” राऊत यांनी स्पष्ट केले की, आम्हाला संघाविषयी आदर आहे, पण सध्या ज्या प्रकारे गुन्हेगारी आणि वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या कलाकारांना महत्त्व दिले जात आहे, त्यावरून संघाचे नैतिक अध:पतन होत असल्याचे दिसून येते.

संघाच्या शताब्दी महोत्सवाच्या या भव्य कार्यक्रमाला लाभलेली सेलिब्रिटींची उपस्थिती आता भाजप आणि शिवसेना यांच्यातील वैचारिक संघर्षाचा नवा केंद्रबिंदू ठरली आहे. संजय राऊत यांच्या या टीकेला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पक्षाकडून काय उत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या