Ind vs Pak T20 World Cup: क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित अशा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे. 15 फेब्रुवारी 2026 रोजी आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कपमध्ये हे दोन्ही संघ आमनेसामने येणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.
खुद्द पाकिस्तान सरकारने या संदर्भात अधिकृत पुष्टी केली असून आपल्या राष्ट्रीय संघाला नियोजित वेळेनुसार मैदानात उतरण्याचे निर्देश दिले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या संघाला या सामन्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
मित्र राष्ट्रांच्या विनंतीनंतर घेतला निर्णय
हा सामना होणार की नाही, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, श्रीलंका आणि बांगलादेश या मित्र राष्ट्रांच्या विनंतीचा मान राखून पाकिस्तान सरकारने खेळण्याचे ठरवले आहे.
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा करून हा पेच सोडवण्याची विनंती केली होती. तसेच बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख अमीनुल इस्लाम यांनीही खेळाच्या हितासाठी हा सामना खेळण्याचे आवाहन केले होते.
४००० कोटींचा ‘महामुकाबला’
रिपोर्टनुसार, भारत आणि पाकिस्तानमधील या एका सामन्याची किंमत जवळपास 4,000 कोटी रुपयांच्या घरात आहे. जागतिक क्रिकेटमध्ये या सामन्याचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने, आयसीसी आणि इतर सहभागी देशांमध्ये या खेळाचे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पाकिस्तान सरकारने म्हटले आहे.
लाहोरमध्ये पीसीबी, बीसीबी आणि आयसीसी यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर अवघ्या 24 तासांत हा सकारात्मक निर्णय समोर आला आहे.
क्रिकेटच्या भावनेचे रक्षण
पाकिस्तान सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बहुपक्षीय चर्चा आणि मित्र देशांच्या विनंतीनंतर आम्ही आमच्या संघाला मैदानात उतरण्याचे आदेश दिले आहेत. क्रिकेटच्या भावनेचे रक्षण करणे आणि हा जागतिक खेळ अखंडपणे सुरू राहणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.”
या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या थरारक सामन्याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.









