Home / महाराष्ट्र / Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपुरात भाजपाची सत्ता; ठाकरेंना सोबत घेऊन केली सत्ता स्थापन, भाजपच्या संगिता खांडेकर महापौरपदी विराजमान

Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपुरात भाजपाची सत्ता; ठाकरेंना सोबत घेऊन केली सत्ता स्थापन, भाजपच्या संगिता खांडेकर महापौरपदी विराजमान

Chandrapur Mayor Election 2026 : गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तेवरून सुरू असलेल्या तीव्र संघर्षाचा आणि अनिश्चिततेचा आज अखेर अत्यंत...

By: Team Navakal
Chandrapur Mayor Election 2026
Social + WhatsApp CTA

Chandrapur Mayor Election 2026 : गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तेवरून सुरू असलेल्या तीव्र संघर्षाचा आणि अनिश्चिततेचा आज अखेर अत्यंत नाट्यमय शेवट होणार असल्याचे दिसत आहे. महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सत्तेचे पारडे कोणाकडे झुकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली. आणि भाजपच्या संगीता खांडेकर यांची चंद्रपूरच्या नव्या महापौर म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे महापालिकेवर भाजपची सत्ता प्रस्थापित झाली असून, विरोधातील काँग्रेसचा मनसुबा फसला आहे.

अटीतटीच्या लढतीत भाजपच्या संगीता खांडेकर विजयी; केवळ एका मताने काँग्रेसचा पराभव
या निवडणुकीतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे संगीता खांडेकर यांचा झालेला विजय. राजकीय डावपेच, नगरसेवकांची अनुपस्थिती आणि तटस्थ भूमिका अशा अनेक वळणांनंतर खांडेकर यांनी केवळ एका मताच्या निसटत्या फरकाने विजय संपादित करत चंद्रपूरचे महापौरपद आपल्या नावावर केले आहे.

मतांचे गणित आणि चुरशीची लढत-
या निवडणुकीत अत्यंत काटाजोड लढत पाहायला मिळाली. भाजपच्या संगीता खांडेकर यांनी ३२ मते मिळवून विजयावर मोहोर उमटवली. त्यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराला ३१ मते मिळाली. विजयासाठी आवश्यक असलेले हे एक जास्तीचे मत मिळवण्यात भाजपला यश आले आणि त्या जोरावर त्यांनी सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली. काँग्रेसला विजयाने अगदी जवळून हुलकावणी दिली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

वंचित आणि एमआयएमची भूमिका ठरली निर्णायक-
वंचित बहुजन आघाडी: ‘वंचित’चे नगरसेवक मतदानावेळी गैरहजर राहिले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहातील मतांचे एकूण गणित बदलले, ज्याचा प्रत्यक्ष फायदा भाजपला झाला.
एमआयएम (MIM): एमआयएमच्या नगरसेवकांनी या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली.

सकाळच्या बैठकीत खटके आणि राजकीय वळण-
मात्र या सगळ्यात बळी गेला तो काँग्रेसचा. चंद्रपुरातील या राजकीय नाट्याची सुरुवात आज सकाळी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्यात सत्तेच्या समीकरणांबाबत महत्त्वाची चर्चा झाली. मात्र, या बैठकीत दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आणि शाब्दिक चकमक उडाली. या वादातून संदीप गिऱ्हे अत्यंत संतापून बैठकीतून बाहेर पडले. या घटनेने काँग्रेस आणि ठाकरे गटातील संभाव्य आघाडीत मोठी दरी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले.

भाजपचा बाजीगर डाव आणि शिवसेनेची साथ-
काँग्रेससोबतची चर्चा फिस्कटल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. काही वेळातच भाजपचे स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मोठी घोषणा केली. ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी अधिकृतपणे जाहीर केले. या अनपेक्षित युतीमुळे महापालिकेतील त्रिशंकू अवस्था संपुष्टात आली असून भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला.

काँग्रेससाठी मोठा राजकीय पेच-
विदर्भात काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विजय वडेट्टीवार यांच्यासाठी हा निकाल एक मोठा वैयक्तिक आणि राजकीय फटका मानला जात आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने स्थानिक पातळीवर भाजपशी हातमिळवणी केल्यामुळे आगामी काळातील आघाडीच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चंद्रपुरात ‘मातोश्री’च्या आदेशाला स्थानिक नेत्यांकडून बगल? संजय राऊतांचा दावा फोल, ठाकरेंच्या शिवसेनेची भाजपशी हातमिळवणी
चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तासंघर्षात मंगळवारी एक अत्यंत अनपेक्षित आणि नाट्यमय वळण पाहायला मिळाले. “कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवा,” हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा स्पष्ट संदेश असल्याचे सकाळी सांगणाऱ्या नेत्यांच्या दाव्याला छेद देत, स्थानिक पातळीवर मात्र ठाकरे गटाने चक्क भाजपशीच घरोबा केला. या धक्कदायक निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

संजय राऊतांचे विधान आणि सकाळची रणनीती-
आज सकाळी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका मांडली होती. चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कडक सूचना दिल्या असून, काँग्रेस आणि शिवसेना (UBT) एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. या विधानामुळे भाजपविरोधात महाविकास आघाडीची वज्रमूठ कायम असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, चंद्रपुरात प्रत्यक्ष परिस्थिती काही तासांतच पूर्णपणे उलटली.

जोरगेवारांची घोषणा आणि राजकीय धक्का-
संजय राऊतांच्या विधानानंतर काही वेळातच चंद्रपूरमध्ये स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी एक मोठी घोषणा केली. ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपच्या महापौर उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर करताच राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. वरिष्ठ पातळीवरील आदेश आणि स्थानिक नेत्यांची कृती यामध्ये मोठी तफावत दिसून आल्याने, पक्षांतर्गत समन्वयावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

‘मातोश्री’चा आदेश की स्थानिक गरज?
काँग्रेससोबत सत्तेत वाटा मिळवण्यावरून निर्माण झालेली कोंडी आणि भाजपसोबत मिळणारी ‘स्थायी समिती’ची संधी, यामुळे स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांच्या भूमिकेपेक्षा स्थानिक सत्तेला अधिक महत्त्व दिल्याचे बोलले जात आहे. भाजपला रोखण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेने अखेर भाजपलाच सत्तेच्या खुर्चीवर बसवण्यासाठी मदत केल्याने, काँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे.

“भाजपला साथ नको, भलेही विरोधात बसा”; चंद्रपूर सत्तासंघर्षावर संजय राऊतांनी स्पष्ट केली होती उद्धव ठाकरेंची भूमिका
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीवरून राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व पेच निर्माण झाला होता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कडक संदेश प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते कि चंद्रपुरात सत्तेसाठी भाजपशी कोणत्याही प्रकारची हातमिळवणी केली जाणार नाही, अशी अधिकृत भूमिका देखील त्यांनी आज सकाळी मांडली होती.

उद्धव ठाकरेंच्या थेट सूचना-
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, चंद्रपूरमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत स्पष्ट आणि लेखी स्वरूपाच्या सूचना दिल्या आहेत. “एकवेळ सत्तेविना विरोधी बाकावर बसावे लागले तरी चालेल, परंतु ज्या पक्षाशी (भाजप) आपला वैचारिक आणि राजकीय लढा सुरू आहे, त्यांना सत्तेवर बसवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य किंवा पाठिंबा दिला जाणार नाही,” असे उद्धव ठाकरे यांनी बजावल्याचे राऊत यांनी सांगितले होते.

‘तडजोड नाही’ हीच पक्षाची नीती-
पुढे ते म्हणाले होते की, “आमची भूमिका ही केवळ सत्तेसाठी नसून तत्त्वांची आहे. भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशी कोणतीही कृती शिवसेनेचा कोणताही पदाधिकारी करणार नाही.” या विधानातून त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचे आणि भाजपला रोखण्याचे संकेत दिले होते. मात्र, प्रत्यक्षात चंद्रपूरच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेली भूमिका ही राऊत यांनी मांडलेल्या भूमिकेच्या पूर्णपणे विरुद्ध असल्याचे दिसून आले.

वरिष्ठांचा आदेश विरुद्ध स्थानिक वास्तव-
संजय राऊत यांनी सकाळी मुंबईतून दिलेला हा इशारा आणि त्यानंतर चंद्रपुरात स्थानिक नेत्यांनी भाजपला दिलेला पाठिंबा, यामुळे आता ठाकरे गटात अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता असल्याचे दिसून येते.

सत्तेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने का स्वीकारली भाजपची साथ? संदीप गिऱ्हे यांनी केला खुलासा-
चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणाने आज अनपेक्षित वळण घेतले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने थेट भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या धक्कादायक निर्णयामागील नेमकी कारणे आणि सत्तेचे ठरलेले समीकरण काय आहे, यावर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी सविस्तर प्रकाश टाकला आहे.

काँग्रेससोबतच्या वाटाघाटी का फिस्कटल्या?
संदीप गिऱ्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेची प्राथमिक इच्छा ही महाविकास आघाडी म्हणून काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याची होती. “आमच्या पक्षाला महापौरपद मिळावे, ही आमची प्रमुख मागणी होती. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मी आज सकाळी स्वतः काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कार्यालयात गेलो होतो. त्यांना विनंती केली की, पाच वर्षांच्या कार्यकाळात आम्हाला किमान काही काळासाठी महापौरपद देण्यात यावे. मात्र, काँग्रेस पक्ष पाच वर्षांत कुठेही शिवसेनेला महापौरपद देण्यास तयार नव्हता,” असे गिऱ्हे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या या ताठर भूमिकेमुळे आणि सन्मानजनक वाटा मिळत नसल्याने अखेर शिवसेनेने पर्यायी मार्गाचा विचार केला.

विकासासाठी घेतलेला निर्णय-
शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे संदीप गिऱ्हे यांनी आवर्जून सांगितले. “केवळ सत्तेसाठी नाही, तर शहराच्या हितासाठी आणि पक्षाच्या अस्तित्वासाठी आम्हाला हा सन्मानजनक फॉर्म्युला स्वीकारणे भाग पडले,” असेही त्यांनी नमूद केले.

Chandrapur Election Result 2026: चंद्रपूर महापालिका पक्षीय बलाबल
एकूण जागा ६६

काँग्रेस २७
काँग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी असलेली जनविकास सेना ३
भाजप २३
शिंदेंसेना १
उबाठा शिवसेना ६
वंचित २
बसपा १
अपक्ष (काँग्रेस बंडखोर) २
एमआयएम १

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या