Rohit Pawar On Ajit Pawar – अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे दुखवट्याचे 13 दिवस उलटल्यानंतर आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांचा घातपात करण्यात आला, असे ठाम विधान केले. हा घातपात कशामुळे झाला? हा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहित पवार यांनी सांगितले की, अजित पवार हे गाडीने मुंबईहून निघणार होते.
मात्र त्या दिवशी पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फाईलवर सही करायची होती. ती फाईल मंत्रालयात होती. ती मागवून त्यावर सही करेपर्यंत वेळ झाल्याने त्यांनी गाडीने न जाता दुसर्या दिवशी सकाळी विमानाने बारामतीला जाण्याचा निर्णय घेतला. हा अजित पवारांच्या पक्षातील विदर्भातील नेता कोण? याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर रोहित पवार यांनी अत्यंत महत्त्वाचा संशय व्यक्त केला. ते म्हणाले की, गेले काही महिने मी सतत अजित पवार आणि सरकारी अधिकार्यांबरोबर होतो.
यावेळी अजित पवार हे एका मोठ्या राजकीय सल्लागाराचे कोट्यवधीचे कंत्राट रद्द करण्याच्या तयारीत होते. यातूनच अजित पवार यांचा घातपात करण्यात आला का? हा प्रश्न या वाक्यातून उपस्थित होतो. आपल्या आयुष्याला धोका आहे याची कुणकुण अजित पवारांना लागली होती का? रोहित पवारांनी सांगितले की, पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटलीत काहीही मिसळले जाऊ शकते. यामुळे गेले काही महिने अजित पवार हे प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी न पिता काचेच्या बाटलीतून पाणी पिऊ लागले होते. हे पाणीही आधी तपासून सुरक्षा रक्षकाच्या हाती दिले जायचे. अजितदादांनी हा बदल का केला होता? असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला. स्वत:चे विमान घ्या आणि त्यातूनच प्रवास करा, हेही अजितदादा मला वारंवार सांगत होते, असेही रोहित पवारांनी सांगितले.

ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमानातून अजित पवारांनी अखेरचा प्रवास केला ते विमान दुरुस्त होते का, त्या विमानाचे पायलट कपूर यांनी मद्यपान केले होते की नाही, मुंबई विमानतळावरील उड्डाणाच्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे का, सुरक्षित अशा 29 नंबरच्या धावपट्टीवर विमान न उतरवता ते 11 नंबरच्या धोकादायक धावपट्टींवर उतरवण्याचा प्रयत्न का केला, ऐनवेळी 2 वैमानिक का बदलण्यात आले, वैमानिकांनी मेडेची सूचना का दिली नाही, विमानातील संपर्क यंत्रणा बंद का होती, विमानात पेट्रोलचे कॅन ठेवले होते का असे सवाल विचारत रोहित पवार यांनी मागणी केली की, अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे. ही चौकशी फ्रान्स, अमेरिका आणि युके येथील कंपन्यांमार्फत करावी आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत व्हीआरएस कंपनीची सर्व उड्डाणे स्थगित करावीत, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, दादा नेहमी घड्याळ घालायचे, ते घड्याळ 15 मिनिटे पुढे ठेवायचे, ते घड्याळ मी बघितले. त्यामुळे जे झाले नाही असे तुम्हाला वाटते ते दुर्दैवाने घडले आहे. अजित दादांच्या प्रेमापोटी आम्ही ही माहिती गोळा केली. खरे काय घडले ते माहीत व्हावे हा यामागचा उद्देश आहे.

मुंबई ते बारामती हे 210 किलोमीटर अंतर 27 मिनिटांत लेअरजेट विमानाने जायचे होते. हे वेगाने व उंचीवरून जाणारे विमान आहे. दादा डावीकडे बसले असावे. मागच्या बाजूला सामान असते. तिथे पेट्रोलच्या टाक्या असतात. हे विमान 16 वर्षे जुने आहे. विजयकुमार व रिमी सिंग हे कंपनीचे मालक आहेत. विजयकुमार व रोहित ते विस्ता कंपनीचे भागधारक आहेत, असे 27 भागधारक आहेत, व्हीएसआर कंपनीकडे सर्वात जास्त लेअरजेट विमाने आहेत. 7.02 मिनिटाला क्रू मुंबई विमानतळावर पोहोचला, त्यामुळे बारामती येथे व्हिसिब्लिटी आहे असे सांगितले. 7.56 वाजता मुंबईला टेकऑफ करतो कळविले. एका ग्रुप चॅटवर अधिकारी, पीए आहेत. विमान लोणावळा, मग पुणे, यवत, सुपे येथे असेल. त्यानंतर अपघात झाला. 9 वाजता दादा जखमी आहेत सांगितले. 9.45 वाजता निधनाची बातमी आली. विमान चालविणार्यांकडे जे अॅप असते त्यात माहिती असते.
दोन दिवसांपूर्वी हेच विमान सूरतला जाऊन आले होते. मालकाने सांगितले की, विमान चांगल्या स्थितीत होते. देखरेख उत्तम होती. वैमानिक सक्षम होते. धुक्यामुळे दिसत नसल्याने अपघात झाला असावा. मात्र तेथील नागरिक म्हणतात की, या विमानाचा आवाज वेगळा होता, म्हणजे या विमानाच्या देखरेखीचा संशय येतो. विमान उडवण्यापूर्वी तपासले होते का? विमानाचे टेकलॉग कुठे आहे? विमानाच्या हँगरभोवती सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते तपासावे लागतील.
या कंपनीत डीजीसीएचे (नागरी उड्डाण महासंचालनालय) अधिकारी काम करतात. गेले काही दिवस त्यांनी फक्त सीसीटीव्ही गोळा केले आहे, म्हणून आम्हाला भीती की, अहवाल बदलला जाईल. तेथे धुके होते म्हणून अपघात झाला. एवढ्यावर हे ढकलून चालणार नाही. 2023 साली याच कंपनीच्या विमानाला मुंबईत अपघात झाला, पण अजून त्याचा अहवाल आलेला नाही. कारण व्हीएसआरचा डीजीसीएवर ताबा आहे असा आमचा संशय आहे.

व्हीएसआरची मोठी विमाने लंडनलाही जातात. त्यामुळे लंडनने त्यांना 2023 साली अपघात कसा झाला त्याची माहिती मागितली, पण त्यांनी अहवाल दिला नाही. आणि त्यामुळे ब्रिटनने व्हीएसआरवर बंदी आणली. देशात मात्र अजूनही या कंपनीची उड्डाणे सुरू आहेत. ती थांबवली जात नाहीत. व्हीएसआर कंपनीत काम करणारे माजी वैमानिक व इतर अधिकार्यांकडून माहिती घेतली. त्यांच्याकडून कळले की, वैमानिकाला 12 तासांची विश्रांती दिली जात नाही, कॉकपीटमधील व्हॉईस रेकॉर्ड बंद ठेवले जाते, एसओपी नाही, खर्चकपात करण्यात कंपनी माहीर आहे. 2300 तासांनंतर इंजिन बदलावे लागते. मात्र तास खोटे लिहून तसेच चालवले जाते.
विमान उडाले आणि घिरटी घातल्यावर वैमानिकाने तिसरी घिरटी न घेता दुसर्या घिरटीत उतरवले. दादांना बारामतीला सोडून ते विमान पाटण्याला जायचे होते. त्याचे 10 लाख बुडू नयेत म्हणून उतरवायचा दबाव वैमानिकावर आणला का? विमानातील टॉकीवरून ते बोलतात ते समजते, पण ती पीटीटी सिस्टिम बंद होती. विमान जमिनीजवळ अधिक आले तर इशारा देते की, जमीन जवळ आली, पण हा इशारा ऐकू आला नाही. ही कंपनी स्वतःच स्वतःच्या विमानांची देखरेख करायची, हे तज्ज्ञ आहेत का? रमेश हा त्या विभागाचा प्रमुख आहे त्याची चौकशी का केली नाही?
व्हीएसआर कंपनी हे जास्तीचे 50 लिटरचे पेट्रोल कॅन विमानात ठेवायची म्हणजे पेट्रोल उपलब्ध नसेल तर या कॅनमधील पेट्रोल वापरायचे. अशा तर्हेने पेट्रोल ठेवणे हे बॉम्ब ठेवल्यासारखे आहे. या कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे आमचे मत आहे.एका सुरक्षा अधिकार्याने सांगितले की राईज अॅण्ड कील फर्स्ट या पुस्तकात म्हटले आहे की, एखाद्याला मारायचे तर त्या व्यक्तीच्या चालकाला मारायचे. या प्रकरणात हेच घडले का?
27 जानेवारीला ठरले की, सायंकाळी विमानाने बारामतीला जायचे. पण त्यांच्या पक्षातील पूर्व विदर्भातील एक नेते आहेत, त्यांना एका फाईलवर सही हवी होती. ती फाईल मंत्रालयातून आली. मग त्यावर सही केली, त्यात उशीर झाला आणि त्यामुळे दुसर्या दिवशी विमानाने जायचे ठरले. अपघातापूर्वी काही महिने आम्ही सतत एकत्र होतो. ते आणि अधिकारी यांच्यासोबत मी घट्ट होतो. तेव्हा एका राजकीय सल्लागाराचे काही कोटींचे कंत्राट रद्द करायचे ठरत होते.

8.18 वाजता विमान बारामतीच्या संपर्कात आले, पीआयबी हे 8.19 वाजता म्हणते, विमानाची धावपट्टी 11 दिसते, पाठक मॅडम ओ शीट, ओ शीट म्हणाल्या, पण वैमानिकाने मेडे संदेशही दिला नाही. त्या नोंदण्यांमध्ये 20 सेकंदांचा फरक आहे. हा फरक मोठा आहे. विमानात ट्रान्सपाँडर असतो तो सर्व माहिती रेकॉर्ड करतो, पण शेवटच्या एक मिनिटाला हा ट्रान्सपाँडर बंद होता, तो बंद होता की बंद केला? याची चौकशी व्हावी.
बारामतीला हेलिकॉप्टर उतरतात तेथे एमआयडीसीची जमीन पठार आहे. याच 29 धावपट्टीची परवानगी वैमानिकाने मागितली व त्याला ती दिली. त्यानंतर दोन मिनिटांनी अवघड अशा 11 धावपट्टीची परवानगी मागितली. घिरटी मारून येताना पुन्हा 29 धावपट्टीची परवानगी मागितली आणि विमान शेवटी 11 वर उतरवले. सुरक्षित 29 धावपट्टीवर का उतरवले नाही? विमान पठारावर उतरवण्याची संधी असताना ते धडकवायचेच या उद्देशाने मुद्दाम डोंगराळ भागाकडे नेले जात होते का?
बीईए (फ्रान्स), एएआयबी (युके), एनटीएसबी (अमेरिका) या कंपन्यांकडे चौकशी द्या. सीआयडी नको, त्यांना पूर्ण अधिकार नाही, वेळ काढला तर कागदपत्रे बदलतील, देशातील एक व परदेशातील एक संस्थेकडून चौकशी व्हावी. प्लास्टिक बाटलीत काहीही बाहेरून टाकता येते म्हणून गेल्या काही महिन्यात प्लास्टिक बाटलीवरून दादा काचेच्या बाटलीवर आले, ती बाटली तपासून त्यांच्या हाती दिली जायची. ते असे का करू लागले होते?ते म्हणायचे की, अलीकडे स्वत: बरेच काही घडत आहे. स्वतःचे, विमान घे, हे का सांगायचे माहीत नाही. पण आता चौकशी झाली पाहिजे.

पतंजली कनेक्शन
साई व अॅरो या दोन एव्हिएशन कंपन्या आहे. त्यांना राजकीय नेत्यांना हेलिकॉप्टर पुरविण्याचे कंत्राट दिले आहे. ते मंत्र्यांचे वेळापत्रक, हेलिकॉप्टर उपलब्धता याची माहिती देतात. त्यासाठी ग्रुप बनवतात, त्यावर कंपनीचे अधिकारी, वैमानिक, क्रू, मंत्र्यांचे पीए असतात. अॅरो ग्रुपवर आदल्या दिवशी 27 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता विमानाने जायचे ठरले, असा संदेश आहे. अॅरो ग्रुपवर ती माहिती आहे. या कंपनीचा एक मालक पतंजली कंपनीवरही आहे असे कळते आहे.
पायलट का बदलले?
रोहित पवार म्हणाले की, मुख्य पायलट का बदलले? साहिल मदन व यश हे नियोजित पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे सांगतात. ते कुठे होते? त्याचे सीसीटीव्ही बघितले का? जो पायलट ऐनवेळी आणला त्या पायलटने मद्यपान केले का हे तपासले का? कपूर हे नुकतेच आंतरराष्ट्रीय विमानाने सिंगापूरहून आले होते, मग त्या प्रवासात ते प्यायले होते का? कपूरला आधी मद्यपान केल्याने निलंबित केले होते. त्याला लेअरजेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला पाठवले, पण मद्यपान केल्याने त्यांना परत पाठवले होते.
एका मोठ्या नेत्याने मला सांगितले की, नांदेडला याच पायलट बरोबर जाताना या वैमानिकाविरुद्ध त्यांनी कंपनीकडे तक्रार केली होती ती तक्रार तपासायला हवी होती. या कंपनीच्या डायरेक्टरचा मुलगा कॅप्टन रोहित हाही मद्यपान करतो, असे मेसेज आहेत. डायरेक्टरच मद्यपान करतो तर वैमानिकांवर ते काय कारवाई करणार?
हे देखील वाचा –
लोकलच्या गर्दीने घेतला जीव; बारावीच्या परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
तो अपघात नव्हता घातपात होता”-अजित पवार विमान दुर्घटनेवर रोहित पवारांचा थेट घातपाताचा संशय










