Rajpal Yadav Surrenders at Tihar Jail : बॉलिवूडमधील दिग्गज विनोदी अभिनेता राजपाल यादव याच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागत आहे. चेक बाऊन्स आणि कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. परिणामी, राजपाल यादवने तिहार जेलमध्ये शरणागती पत्करली आहे. त्याला ६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
हे प्रकरण २०१० सालापासून सुरू आहे. राजपाल यादवने ‘अता पता लापता’ या आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणाच्या चित्रपटासाठी ‘मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ कडून सुमारे ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला आणि राजपाल आर्थिक संकटात सापडला. वेळेत परतफेड न झाल्यामुळे व्याजासह ही रक्कम आता ९ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. या कर्जाच्या बदल्यात दिलेले चेक बाऊन्स झाल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाली होती.
न्यायालयाने का दाखवला कठोरपणा?
गेल्या अनेक वर्षांपासून राजपाल यादवला हप्ते भरण्यासाठी न्यायालयाने अनेकदा मुदतवाढ दिली होती. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्याने ७५ लाख रुपयांचे दोन ड्राफ्ट जमा केले होते, तरीही मोठी रक्कम शिल्लक होती. वारंवार दिलेल्या आश्वासनांचे पालन न झाल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला.
न्यायमूर्तींनी स्पष्ट केले की, एखादी व्यक्ती विशिष्ट क्षेत्रातील किंवा ग्लॅमरस दुनियेतील आहे म्हणून तिला विशेष वागणूक दिली जाऊ शकत नाही. शिस्त आणि कायद्याचे पालन सर्वांसाठी समान आहे, असे म्हणत न्यायालयाने त्याची शेवटची विनंतीही फेटाळून लावली.
चित्रपटसृष्टीतून मदतीचा हात
तुरुंगात जाण्यापूर्वी राजपाल यादवने आपली हतबलता व्यक्त केली होती. “माझ्याकडे पैसे नाहीत, आता दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही,” असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. यावेळी त्याने सिनेसृष्टीतील लोकांकडून मदत मिळत नसल्याची खंतही व्यक्त केली होती.
मात्र, राजपालच्या या कठीण काळात अभिनेता सोनू सूद त्याच्या मदतीला धावून आला आहे. सोनू सूदने सोशल मीडियावर जाहीर केले की, तो राजपालला आपल्या आगामी चित्रपटात भूमिका देणार असून त्यासाठी त्याला साइनिंग अमाऊंटही देणार आहे. “राजपाल एक उत्तम अभिनेता आहे आणि अशा वेळी आपण सर्वांनी मिळून त्याला साथ दिली पाहिजे,” असे सोनूने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
राजपाल यादव अलीकडेच ‘बेबी जॉन’ आणि ‘इंटर्रोगेशन’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला होता. अक्षय कुमारच्या आगामी ‘भूत बंगला’ या चित्रपटातही तो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे, जो १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.










