Ganeshotsav 2026: महाराष्ट्राचा सर्वात मोठा आणि लाडका सण असलेल्या ‘श्रीगणेशोत्सवा’ला राज्य शासनाने ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून अधिकृत दर्जा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईमध्ये हा सण अत्यंत दिमाखात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आले आहे.
मुंबईतील हजारो सार्वजनिक गणेश मंडळांची धावपळ कमी करण्यासाठी आणि त्यांना सर्व परवानग्या सहज मिळवून देण्यासाठी पालिकेने आधुनिक डिजिटल पाऊल उचलले आहे.
सार्वजनिक ठिकाणी किंवा खाजगी जागेवर मंडप उभारण्यासाठी गणेश मंडळांना आता वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागणार नाहीत. पालिकेने सोमवार, 21 जुलैपासून आपल्या अधिकृत योजना सुरू केली आहे. यामुळे मंडळांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत.
पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही; अशी आहे ऑनलाईन अर्जाची सोपी पद्धत
गणेश मंडळांच्या सुविधेसाठी पालिकेने संपूर्ण अर्ज प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत केली आहे. यासाठी खालील टप्पे ठरवण्यात आले आहेत:
- वेबसाईटवर अर्ज: मंडळांना परवानग्या किंवा जुन्या परवानग्यांचे नूतनीकरण करण्यासाठी पालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- थेट लिंक: या वेबसाईटवर गेल्यानंतर ‘नागरिकांकरिता’ या रकान्यात ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करावे. तिथे असलेल्या ‘मंडप (सार्वजनिक गणेशोत्सव/नवरात्रौत्सव/इतर उत्सव)’ या थेट लिंकवर जाऊन अर्ज भरता येईल.
- नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट: ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर मंडळांना स्थानिक पोलीस ठाणे किंवा वाहतूक पोलिसांकडे ना-हरकत प्रमाणपत्रासाठी स्वतः जाण्याची गरज नाही. पालिका अंतर्गत यंत्रणेद्वारे ही प्रक्रिया स्वतः पूर्ण करेल. विभाग स्तरावर सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ स्तरावर उपायुक्त यांच्या देखरेखीखाली हे काम चालणार आहे.
रस्त्यावर खड्डे केल्यास दंडाचा फटका!
मुंबईतील रस्ते आणि पदपथ सुरक्षित ठेवण्यासाठी पालिकेने यंदा कडक भूमिका घेतली आहे. सध्या बाजारात रस्ते खराब न करता खड्डे विरहित मंडप उभारणीचे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. सर्व गणेश मंडळांनी याच आधुनिक पद्धतीचा वापर करून मंडप उभारावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.
जर मंडप उभारताना रस्त्यावर किंवा फुटपाथवर खड्डे खणल्याचे आढळून आले, तर संबंधित मंडळाकडून रस्त्याच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च आणि प्रति खड्डा याप्रमाणे मोठा आर्थिक दंड वसूल केला जाईल, अशी स्पष्ट चेतावणी प्रशासनाने दिली आहे.
पर्यावरणपूरक मूर्तींवर भर; ९०७ टन शाडू मातीचे मोफत वाटप
यंदाचा गणेशोत्सव बुधवार, 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणस्नेही व्हावा यासाठी पालिकेने थेट मूर्तिकारांना मोठी मदत केली आहे:
- मोफत शाडू माती: पर्यावरणपूरक मूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईतील मूर्तिकारांना पालिकेकडून आतापर्यंत तब्बल 907 टन शाडू माती मोफत देण्यात आली आहे.
- मोफत जागा: मूर्ती तयार करण्यासाठी आणि सुकवण्यासाठी तब्बल 979 मूर्तिकारांना तात्पुरत्या स्वरूपात मंडप घालण्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- कोकणातील मूर्तिकारांना मदत: मुंबईत विक्रीसाठी येणाऱ्या अनेक मूर्ती कोकणातून येतात. त्यामुळे कोकणातही पर्यावरणपूरक मूर्ती तयार व्हाव्यात, यासाठी तेथील मूर्तिकारांना शाडू माती आणि इतर सोयी पुरवण्यासाठी मुंबई पालिकेने कोकण विभागीय आयुक्तांशी विशेष पत्रव्यवहार केला आहे.
देखावे आणि सजावट करतानाही नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्याचाच वापर करावा, असे आवाहन करत या मोहिमेला मुंबईकर आणि गणेशभक्त पूर्ण सहकार्य करतील, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.









