Home / महाराष्ट्र / Mulund Metro Accident : मुलुंडमध्ये मेट्रो प्रकल्पाचा स्लॅब कोसळून भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, ४ जण जखमी- एमएमआरडीएकडून उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना; तांत्रिक त्रुटी आणि हलगर्जीपणाचा होणार सखोल तपास..

Mulund Metro Accident : मुलुंडमध्ये मेट्रो प्रकल्पाचा स्लॅब कोसळून भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, ४ जण जखमी- एमएमआरडीएकडून उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना; तांत्रिक त्रुटी आणि हलगर्जीपणाचा होणार सखोल तपास..

Mulund Metro Accident : मुंबईतील मुलुंड पश्चिम भागातील वर्दळीचा रस्ता असलेल्या लाल बहादूर शास्त्री (LBS) मार्गावर आज मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळून...

By: Team Navakal
Mulund Metro Accident 
Social + WhatsApp CTA

Mulund Metro Accident : मुंबईतील मुलुंड पश्चिम भागातील वर्दळीचा रस्ता असलेल्या लाल बहादूर शास्त्री (LBS) मार्गावर आज मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळून एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेत दोन नागरिकाचा मृत्यू झाला असून, अन्य काही जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ऐन वर्दळीच्या वेळी घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुलुंडमध्ये मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळून भीषण दुर्घटना; प्रशासकीय निष्काळजीपणाचा एक बळी-
मुंबईतील उपनगरांना जोडणाऱ्या मुलुंड पश्चिम येथील अत्यंत वर्दळीच्या लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळल्याची हृदयद्रावक घटना घडली. मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना पुलाच्या स्लॅबचा एक अजस्त्र भाग थेट रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा आणि कारवर कोसळला. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य तीन ते चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

नेमकी घटना आणि बचावकार्य-
आज दुपारी साधारण १२:२० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. नेहमीप्रमाणे एलबीएस मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असताना, अचानक पुलाचा एक मोठा भाग खाली कोसळला. दुर्दैवाने, त्याच वेळी त्या खालून एक रिक्ष आणि एक चारचाकी वाहन जात होते. स्लॅबचा भार वाहनांवर पडल्याने त्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. स्थानिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. जखमींना त्वरित नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे.

सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव आणि जनक्षोभ-
या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे, ज्या ठिकाणी हे अतिधोकादायक काम सुरू होते, तिथे सुरक्षेचे कोणतेही निकष पाळले गेले नसल्याचे दिसून आले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पुलाचे काम सुरू असताना परिसरात कोणत्याही प्रकारचे प्रतिबंधक बॅरिकेड्स (कठडे) लावण्यात आले नव्हते, तसेच वाहतूक वळवण्यासाठी किंवा पादचाऱ्यांना सतर्क करण्यासाठी कोणतेही सुरक्षारक्षक तैनात नव्हते. मेट्रो प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळेच एका निरपराध नागरिकाला आपला प्राण गमवावा लागला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

पुढील कार्यवाही-
या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून, या गंभीर हलगर्जीपणाबद्दल संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

मुलुंड मेट्रो दुर्घटना: कंत्राटदाराचा अक्षम्य निष्काळजीपणा आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन; गंभीर प्रश्न उपस्थित-
मुलुंड पश्चिम येथील एलबीएस मार्गावर मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळून झालेली दुर्घटना ही केवळ एक अपघात नसून तो प्रशासकीय आणि तांत्रिक हलगर्जीपणाचा कळस असल्याचे स्पष्ट होत आहे. या भीषण घटनेत दोन निष्पाप नागरिकाचा बळी गेला असून, याला सर्वस्वी संबंधित कंत्राटदार आणि देखरेख करणारे अभियंते जबाबदार असल्याचे प्राथमिक दर्शनी दिसून येत आहे. जर सुरक्षिततेचे विहित नियम काटेकोरपणे पाळले असते, तर ही जीवितहानी निश्चितपणे टाळता आली असती.

सुरक्षा मानकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष-
मेट्रो प्रकल्पाच्या नियमावलीनुसार, जोपर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण होत नाही आणि त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट (संधारणात्मक परीक्षण) होत नाही, तोपर्यंत संबंधित भागाभोवती संरक्षक कठडे (बॅरिकेड्स) असणे अनिवार्य असते. बांधकामाचा कोणताही भाग पूर्ण झाल्यानंतर तज्ज्ञ अभियंत्यांकडून त्याचे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. हे काम अपेक्षित मापदंड आणि गुणवत्तेनुसार झाले आहे याची खात्री पटल्यानंतरच अभियंता त्यावर आपल्या स्वाक्षरीने शिक्कामोर्तब करतो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय सुरक्षा कठडे हटवणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. मात्र, मुलुंडच्या घटनेत काम पूर्ण होण्यापूर्वीच किंवा योग्य तपासणीविना हे बॅरिकेड्स का काढण्यात आले, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

दुर्घटना टाळता आली असती-
तांत्रिक विश्लेषणानुसार, जर या ठिकाणी संरक्षक कठडे योग्यरीत्या तैनात असते, तर स्लॅबचा कोसळलेला भाग थेट रस्त्यावरील वाहनांवर न पडता प्रथम त्या बॅरिकेड्सवर आदळला असता. यामुळे पडणाऱ्या भागाचा वेग आणि दिशा नियंत्रित होऊन मोठी दुर्घटना टळली असती. कंत्राटदाराने सुरक्षेच्या या मूलभूत नियमांना केराची टोपली दाखवल्यामुळेच रिक्षा आणि कारमधील प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालावा लागला.

कायदेशीर कारवाईची मागणी-
या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. ज्या अभियंत्यांनी या कामाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेवर देखरेख करणे अपेक्षित होते, त्यांच्यावरही कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मेट्रो प्रशासनाने आपल्या सुरक्षा धोरणांचे पुनरावलोकन करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

सुरक्षा मानकांना बगल दिल्याने ओढवला भीषण प्रसंग- पर्यवेक्षण आणि तांत्रिक मान्यतेवर प्रश्नचिन्ह-
मेट्रोच्या कामात प्रत्येक टप्प्यावर कडक देखरेख (Supervision) असणे अनिवार्य असते. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, संबंधित स्थळी कार्यरत असलेला सुपरवायजर (पर्यवेक्षक) नेमके काय करत होता, हा कळीचा मुद्दा ठरला आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर त्याचे तांत्रिक परीक्षण झाले होते का, आणि ज्या अभियंत्याने (Engineer) या कामाला मंजुरी दिली, त्याने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाच्या दर्जावर स्वाक्षरी केली होती का, असे अनेक अनुत्तरित प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. जर हे काम अधिकृत मापदंडांनुसार झाले असते आणि सक्षम अधिकाऱ्याने त्यावर शिक्कामोर्तब केले असते, तर अशा प्रकारचा तांत्रिक बिघाड होऊन स्लॅब कोसळण्याची शक्यता धुसर होती.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, कामाच्या ठिकाणी असलेले सुरक्षा कठडे (बॅरिकेड्स) कोणत्या अधिकाराने आणि का हटवण्यात आले? यावर प्रशासनाकडून असे स्पष्टीकरण दिले जात आहे की, एलबीएस मार्ग हा अतिशय वर्दळीचा असून तिथे वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बॅरिकेट्स काढण्यात आले होते. मात्र, केवळ वाहतूक सुरळीत करण्याच्या नावाखाली नागरिकांचा जीव धोक्यात घालणे आणि सुरक्षा व्यवस्थेला पूर्णपणे बगल देणे, हा कंत्राटदाराचा मोठा गुन्हा मानला जात आहे. नियमानुसार, जोपर्यंत कामाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ पूर्ण होत नाही, तोपर्यंत संरक्षक कवच हटवणे हे कायद्याचे उल्लंघन आहे.

निकृष्ट दर्जा आणि सखोल चौकशीचे आदेश-
या बांधकामाचा दर्जा इतका निकृष्ट कसा होता, की पूर्ण होण्यापूर्वीच त्याचा भाग कोसळला, याची चौकशी आता तांत्रिक तज्ज्ञांमार्फत केली जाणार आहे. कंत्राटदार कंपनीने नफ्यासाठी साहित्याच्या गुणवत्तेत तडजोड केली का, याचाही शोध घेतला जाईल. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या प्रत्येक घटकावर, मग तो कंत्राटदार असो वा संबंधित सरकारी अभियंता, कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या घटनेमुळे मुंबईतील इतर सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस प्रशासन, मेट्रो प्राधिकरणाचे तांत्रिक कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी रुग्णवाहिकेसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रशासकीय यंत्रणांनी त्वरित संपूर्ण परिसराचा ताबा घेऊन बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेतले.

बचावकार्य आणि वाहतूक नियंत्रण-
दुपारच्या अत्यंत वर्दळीच्या वेळी ही दुर्घटना घडल्यामुळे एलबीएस मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी तातडीने या मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्यांकडे वळवून परिस्थिती नियंत्रणात आणली. रस्त्यावर पडलेला अवजड ढिगारा आणि स्लॅबचे तुकडे हटवण्यासाठी अत्याधुनिक क्रेन आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी दबले गेले नाही ना, याची खात्री पटवण्यासाठी बचाव पथकांनी सलग काही तास शोधमोहीम राबवली. ढिगारा पूर्णपणे हटवल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक संथ गतीने पूर्ववत करण्यात आली.

महानगरपालिकेची तात्काळ कार्यवाही-
घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तातडीने सतर्क करण्यात आले. महानगरपालिकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घटनेची वर्दी मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस पथक, मेट्रो प्राधिकरणाचे तांत्रिक कर्मचारी आणि महानगरपालिकेचे संबंधित विभागाचे (वॉर्ड) कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी ‘१०८’ रुग्णवाहिका सेवादेखील पाचारण करण्यात आली. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून ढिगारा हटवण्याचे आणि जखमींना बाहेर काढण्याचे कार्य त्वरित सुरू करण्यात आले.

जखमींची प्रकृती आणि प्राथमिक अंदाज-
महानगरपालिकेच्या प्राथमिक अंदाजानुसार, ज्यावेळी मेट्रोच्या खांबाचा भाग कोसळला, तेव्हा त्याखाली दबल्या गेलेल्या रिक्षामध्ये ३ ते ४ प्रवासी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अपघातात सर्व जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत तपशील मिळणे अद्याप बाकी आहे. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन या घटनेच्या प्रत्येक पैलूवर बारीक लक्ष ठेवून असून, ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्याचे काम पूर्ण खबरदारीने केले जात आहे.

एमएमआरडीएकडून उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना-
या प्रकरणी आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी आणि तांत्रिक कारणांचा शोध घेण्यासाठी एमएमआरडीएने एका उच्चस्तरीय चौकशी समितीची घोषणा केली आहे. ही समिती या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करून आपला अहवाल सादर करणार असून, त्या आधारे दोषींवर कठोर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

तपासाचे स्वरूप आणि तांत्रिक निकष:
ही उच्चस्तरीय समिती प्रामुख्याने बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा, इंजिनिअरिंग डिझाइनमधील त्रुटी आणि प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाळण्यात आलेली सुरक्षा मानके यांची काटेकोर तपासणी करणार आहे. प्रकल्पाचे काम सुरू असताना सुरक्षा कठडे (बॅरिकेड्स) हटवण्याचे आदेश कोणी दिले आणि त्यामागे तांत्रिक निकष पाळले गेले होते का, यावर समिती आपला लक्ष केंद्रित करणार आहे. याशिवाय, ज्या कंत्राटदाराकडे या मार्गाचे काम सोपवण्यात आले होते, त्यांच्याकडून कामाच्या विविध टप्प्यांवर झालेल्या देखरेखीचा (Supervision) अहवालही समितीकडून तपासला जाणार आहे.

मुलुंड येथील दुर्घटना दुर्दैवी; बाधितांना शासन सर्वतोपरी मदत करणार आणि प्रकरणाची सखोल चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-
मुंबईतील मुलुंड परिसरात नुकतीच घडलेली घटना अत्यंत क्लेशदायक आणि दुर्दैवी असून, या घटनेमुळे निर्माण झालेली परिस्थिती चिंताजनक आहे. या गंभीर घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली संवेदनशीलता व्यक्त केली आहे. “मुलुंडमध्ये घडलेली ही घटना अत्यंत वेदनादायी आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या असून, पीडितांच्या कुटुंबांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. शासनाकडून या घटनेतील बाधितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून दिली जाईल,अशी माहिती देखील समोर आली आहे.

केवळ मदतीची घोषणा करून न थांबता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली आणि यामागे कोणाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे का, या सगळ्याची सखोल चौकशी केली जाईल. “या घटनेच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर आणले जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

“हा शंभर टक्के निष्काळजीपणाच”; मुंबईच्या महापौर रितू तावडे ऍक्शन मोडवर-
मुलुंड पश्चिम येथील एलबीएस मार्गावर मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासकीय आणि तांत्रिक यंत्रणेवर तीव्र ताशेरे ओढले. “ही घटना म्हणजे केवळ अपघात नसून, कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणांचा अक्षम्य निष्काळजीपणा आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

नव्याने बसवलेली भिंत कोसळल्याने प्रश्नचिन्ह-
महापौर रितू तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोसळलेली ‘पॅरापेट वॉल’ (संरक्षक भिंत) अवघ्या एक दिवसापूर्वीच बसवण्यात आली होती. “काल बसवलेली भिंत जर आज कोसळत असेल, तर हे कामाच्या निकृष्ट दर्जाचे जिवंत उदाहरण आहे,” असे त्या म्हणाल्या. घटनास्थळाचे फोटो आणि चित्रफिती पाहिल्यानंतर, कामाच्या ठिकाणी ‘क्युरिंग’ (पाणी मारून सिमेंट पकड धरण्याची प्रक्रिया) योग्य प्रकारे झाली होती का, याबद्दल त्यांनी शंका उपस्थित केली. तसेच, बांधकाम सुरू असताना खाली संरक्षक बॅरिकेट्स का लावण्यात आले नव्हते, हा सर्वात मोठा तांत्रिक प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

सुरक्षा नियमावलीची (SOP) पायमल्ली-
या दुर्घटनेमागची कारणे शोधण्यासाठी महापौरांनी तातडीने प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. “मी वैयक्तिकरित्या आमदारांकडून आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहे. काम सुरू असताना इंजिनिअर्स उपस्थित होते का? सुरक्षा नियमावलीचे (SOP) पालन केले जात होते का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, धोकादायक काम सुरू असताना खालून जाणारी वाहतूक थांबवण्याची खबरदारी का घेतली गेली नाही?” असे गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या सर्व प्रकरणाची शंभर टक्के चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

जखमींवर उपचार आणि महापौरांची संवेदनशीलता-
दुर्घटनेतील जखमींना तातडीने मुलुंड येथील उपासना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, महापौरांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या इतर तीन जखमींवर तिथे उपचार सुरू असून, प्रशासन त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. “मुंबईकरांना पायाभूत सुविधा देताना त्यांच्या सुरक्षिततेचा बळी दिला जाऊ शकत नाही. विकासकामे करताना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होणे ही काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

निष्काळजीपणामुळेच दुर्घटना – मिहिर कोटेचा
या दुर्घटनेसाठी कारणीभूत असलेल्या सुरक्षा त्रुटींवर बोट ठेवत त्यांनी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. “ज्या कंत्राटदार कंपनीवर यापूर्वी ५८ वेळा विविध कामांत चुका केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता, त्याच ‘मिलन’ कंपनीला पुन्हा कंत्राट देण्याचा अट्टाहास प्रशासनाने का केला?” असा रोखठोक सवाल कोटेचा यांनी उपस्थित केला आहे.

मिहिर कोटेचा यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचे वाभाडे काढले. त्यांच्या मते, ज्या ठिकाणी काम सुरू होते, तिथे सुरक्षिततेच्या दृष्टीने किमान नियमांचेही पालन करण्यात आले नव्हते. रस्ता खोदाई किंवा बांधकामाच्या जागी पुरेसे संरक्षक कठडे (बॅरिकेड्स) लावणे बंधनकारक असतानाही, तिथे कोणत्याही प्रकारची अडथळ्यांची व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच, वाहतूक वळवण्यासाठी किंवा पादचाऱ्यांना धोक्याची पूर्वसूचना देण्यासाठी एकाही सुरक्षारक्षकाची नियुक्ती करण्यात आली नव्हती. या सर्व मूलभूत सोयींच्या अभावामुळेच हा भीषण अपघात घडला असून, निष्पाप नागरिकांना याचा नाहक फटका बसला आहे.

“भाजप राजवटीत सामान्यांच्या जिवाची किंमत शून्य”; मुलुंड दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर प्रहार-
मुलुंड येथील मेट्रो ४ च्या बांधकामाधीन मार्गाचा भाग कोसळून झालेल्या भीषण अपघातानंतर राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. आपल्या ‘एक्स’वर त्यांनी या दुर्घटनेचा निषेध नोंदवत प्रशासकीय कारभारातील त्रुटी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. “कंत्राटदारांचे लाड पुरवणाऱ्या या सरकारच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या जिवाची कोणतीही किंमत उरलेली नाही,” अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

कंत्राटदारांच्या पाठीशी उभे राहणारे सरकार-
आदित्य ठाकरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत गेल्या काही काळातील घटनांचा संदर्भ देत सरकारला जाब विचारला आहे. गेल्या वर्षी कोसळलेली भिंत आणि नव्याने उद्घाटन झालेल्या मेट्रो ३ च्या मार्गात पावसाचे पाणी शिरल्याच्या घटनांची आठवण करून देत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “सरकार या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे धाडस दाखवेल का?” त्यांच्या मते, सरकार केवळ नावापुरता काही लाखांचा दंड ठोठावून कंत्राटदाराला पुन्हा नवीन निविदा भरण्याची मुभा देईल. हा प्रकार जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणारा असून कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचेच हे धोरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विकासाच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी आणि असुरक्षितता-
मेट्रोच्या कामातील तांत्रिक विसंगतीवर बोट ठेवताना आदित्य ठाकरे म्हणाले की, बांधकामाचे मूळ काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही खांबांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या अनावश्यक कामांमुळे राज्याच्या तिजोरीवर आधीच कोट्यवधींचा भार पडला आहे आणि प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्यावर पुन्हा तेच काम करण्यासाठी नव्याने कोट्यवधी रुपये खर्च केले जातील. पायाभूत सुविधांच्या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे बॅरिकेटिंग (सुरक्षा कठडे) वापरले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सदोष सुरक्षा व्यवस्थेमुळे एकीकडे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे, तर दुसरीकडे नागरिकांची वाहने उघड्या खड्ड्यात पडून जीवघेणे अपघात घडत आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलीन होण्याची भीती-
राज्यातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवर भाष्य करताना त्यांनी या परिस्थितीला ‘लाजिरवाणी’ असे संबोधले. मेट्रो मार्गावरून सिमेंटचे तुकडे पडणे, असुरक्षित रस्ते आणि मदतीविना खड्ड्यात पडणाऱ्या गाड्या हे चित्र अत्यंत भयावह असल्याचे त्यांनी नमूद केले. “भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत मानवी जीव स्वस्त झाला आहे,” अशी टीका त्यांनी केली.

हे देखील वाचा – Malegaon Tipu Sultan Photo : मालेगावमधील टिपू सुलतान छायाचित्र वाद शमला; हिंदू संघटनांच्या इशाऱ्यानंतर उपमहापौरांनी हटवले छायाचित्र

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या