NCP : राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या विलीनीकरणासाठी अजित पवार गटाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर शरद पवार गटाकडून आज या विषयाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेण्यात आला. विलीनीकरणाची आम्हाला घाई नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केल्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा विषय बंद करत असल्याचे सांगितले. अजित पवारांना चूक सुधारायची होती, असे शिंदेंनी राष्ट्रवादीच्या मुखपत्रातील आपल्या लेखात लिहिल्याचे प्रसिद्ध झाल्यावर काल खळबळ उडाली होती. परंतु त्यावर अजित पवार गटाकडून नाराजी व्यक्त केल्यावर आज शिंदेंनी आता विलीनीकरणावर बोलणार नाही, असा पवित्रा घेतला. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही विलीनीकरणाचा कुठलाही प्रस्ताव आमच्यासमोर आलेला नाही. त्यामुळे विलीनीकरण होणार नाही, असे स्पष्टच सांगितले.
आज नाशिक येथे बोलताना अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांनी म्हटले की, रोज विलीनीकरण, विलीनीकरण ही काय चर्चा लावली आहे? विलीनीकरण आजही करता येईल. एक महिन्याने, दोन महिन्यांनीही करता येईल. घाई करण्याचे कारण काय? सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेल्या आहेत. आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांची निवड करणार आहोत. त्यानंतर पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत. तसेच त्यांना वाटेल त्या नेत्यांना त्या बोलावतील व चर्चा होईल. एवढा हा मोठा निर्णय दोन्ही बाजूंच्या लोकांशी चर्चा करूनच होईल. पूर्वी काय ठरले होते, हे म्हणण्याला काहीच अर्थ नाही. आता नवीन कॅप्टन आल्या आहेत. त्यांना बसू द्या, काम करू द्या. समजून घेऊ द्या. मग काय करायचे ते त्या बघतील.
भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर लगेच शशिकांत शिंदे यांनी शरद पवार गटाची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, आम्ही विलीनीकरणाबाबत भावना व्यक्त केली होती. अनेकांनी तशीच भावना व्यक्त केली होती. निवडणूक झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार होता. विलिनीकरणाचे सूत्र कसे असेल हे चर्चेत ठरवले जाणार होते. चर्चा करणाराच नेता आता राहिलेला नाही, त्यामुळे ‘जर-तर’ वर चर्चा करण्यात अर्थ नाही. आता यावर आम्हाला काहीच भाष्य करायचे नाही. दादा असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणाबाबतचा निर्णय झाला होता. त्यांच्या पक्षातील अनेक लोक याबाबत बोलत आहेत. मात्र आता आम्ही हा विषय बंद केला आहे. आम्हीच विलिनीकरणाच्या मागे लागलो आहे, असे चित्र निर्माण केले जात आहे. आमच्याकडून याबाबतीत गडबड करण्यात आलेली नाही. दादांच्या निधनानंतर त्यांचीच चर्चा सुरू झाली. त्यानंतर आम्ही फक्त सत्य बोललो, शपथपूर्वक बोललो. त्यानंतर आम्ही कधीच बोललेलो नाही. आम्ही एवढेच म्हणालो की, दादांची ही इच्छा होती ती पूर्ण करायची आहे. मात्र आता यावर बोलायचे नाही, असे आम्ही ठरवले आहे.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा या विलीनीकरणाला विरोध आहे का, असे विचारले असता शिंदे म्हणाले की, या बाबतीत मी काही बोलणार नाही. कारण त्यांची भूमिका त्यांनी मांडावी. आता आम्ही पुन्हा जोमाने काम करून पक्ष उभा करण्याची भूमिका घेत आहोत. त्यामुळे याबाबत त्यांची काय भूमिका आहे हे मी सांगणे योग्य ठरणार नाही. अजितदादांची चूक झाली आहे असे मी म्हटले असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. अजित दादांना त्या झालेल्या पक्षाच्या विभाजनाबाबत दुरुस्ती करायची होती. अजितदादा भावनिक होते. आदरणीय शरद पवारसाहेबांच्या भेटीतही अजितदादांनी कधीच त्यांच्याशी नजरानजर केली नाही. विलीनीकरणाबाबत काय निर्णय घ्यायचा हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर ठरणार होते. त्यांच्या मनात काय होते, माझ्या मनात काय होते हे आता गेल्यानंतर सांगणे योग्य नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, विलीनीकरणाचा विषय आमच्यापर्यंत आलेलाच नाही. तूर्तास हा विषय आमच्यासमोर नाही. प्रस्ताव आला तर काय करायचे ते पाहू.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची
नरेश अरोरांसोबत तासभर बैठक
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ व जय पवार आणि पक्षाचे राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा यांची आज तासभर बैठक झाली. अजित पवार नरेश अरोरा यांचे कोट्यवधींचे कंत्राट रद्द करणार होते, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. आज सुरुवातीला पार्थ पवार, जय पवार आणि नरेश अरोरा यांच्यात अजितदादांच्या पुण्यातील जिजाई बंगल्यात एक तास चर्चा झाली. त्यानंतर हे तिघे लगेचच पुण्यातील सर्किट हाऊसवर जाऊन सुनेत्रा पवार यांना भेटले. तिथे चौघांमध्ये चर्चा झाली. राज्यात सुरू असलेल्या विविध राजकीय घडामोडी तसेच पक्षाची भविष्यातील धोरणे व वाटचाल यावर यावेळी चर्चा झाली, असे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा विचार अजित पवार करत होते, असा आरोप रोहित पवार यांनी केल्यानंतर ही बैठक झाल्याने त्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली असण्याची शक्यता असली तरी तिचा तपशील बाहेर आलेला नाही.
————————————————————————————————————————-










