IND vs PAK T20 World Cup: टी-२० विश्वचषक 2026 चा सर्वात मोठा आणि बहुप्रतीक्षित सामना आज रंगणार आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील. विशेष म्हणजे, या स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित राहिले असून, या सामन्यातील विजय एका संघाला थेट ‘सुपर 8’ फेरीचे तिकीट मिळवून देणार आहे.
दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी
डिफेंडिंग चॅम्पियन भारतीय संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात दिमाखात केली आहे. भारताने पहिल्या सामन्यात अमेरिकेचा 29 धावांनी तर दुसऱ्या सामन्यात नामिबियाचा 93 धावांनी पराभव केला. दुसरीकडे, पाकिस्तानने नेदरलँड्सविरुद्ध निसटता विजय मिळवला आणि त्यानंतर अमेरिकेला 32 धावांनी धूळ चारली. सध्या गुणतालिकेत भारत पहिल्या तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे.
प्रमुख खेळाडू आणि फॉर्म
- भारत: सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने 2 सामन्यात 96 धावा केल्या आहेत. गोलंदाजीमध्ये वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 4 बळी घेतले आहेत. मात्र, सलामीवीर अभिषेक शर्माच्या प्रकृतीबाबत अद्याप साशंकता असून सामन्यापूर्वी त्याच्या खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
- पाकिस्तान: साहिबजादा फरहानने 2 सामन्यात 120 धावा कुटल्या आहेत. गोलंदाजीत सलमान मिर्झा, अबरार अहमद आणि उस्मान तारिक यांनी प्रत्येकी 3 गडी बाद करत आपली चमक दाखवली आहे.
हेड-टू-हेड आकडेवारी
टी-२० क्रिकेटच्या इतिहासात भारताचे पारडे जड राहिले आहे. आतापर्यंत झालेल्या 16 सामन्यांपैकी भारताने 13 वेळा विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानला केवळ 3 सामने जिंकता आले आहेत. विश्वचषकाचा विचार केल्यास, 8 भेटींपैकी 7 वेळा भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे.
पाऊस टाकणार का खोडा?
कोलंबोतील हवामान चाहत्यांची चिंता वाढवणारे ठरू शकते. रविवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसाची 50 ते 70 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होण्यापूर्वी मुसळधार पाऊस पडल्यास खेळात व्यत्यय येऊ शकतो किंवा षटकांची कपात केली जाऊ शकते.
लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहाल?
हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर हा सामना थेट पाहता येईल, तर ‘जियोहॉटस्टार’ ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.










