Rashtrapati Bhavan Tour: दिल्लीला भेट देणारे अनेक पर्यटक राष्ट्रपती भवनाच्या भव्य गेटवरूनच फोटो काढून परत फिरतात. मात्र, भारताच्या राष्ट्रपतींचे हे अधिकृत निवासस्थान केवळ बाहेरूनच नाही, तर आतूनही पाहण्याची संधी आता उपलब्ध आहे. ३३० एकरमध्ये पसरलेली ही वास्तू भारतीय लोकशाहीचे वैभव आणि स्थापत्यशास्त्राचा अद्भूत नमुना आहे.
आत गेल्यावर काय पाहायला मिळेल?
राष्ट्रपती भवनाचा हा दौरा ‘गाईड’च्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला जातो. यामध्ये तुम्हाला अशा ऐतिहासिक दालनांमध्ये नेले जाते, जिथे भारताचे राष्ट्रपती परदेशी पाहुण्यांचे स्वागत करतात किंवा जिथे महत्त्वाचे शपथविधी पार पडतात. याशिवाय:
- ज्या हॉलमध्ये भव्य राष्ट्रीय पुरस्कार सोहळे होतात, तिथे तुम्हाला जाता येईल.
- राष्ट्रपती भवनातील संग्रहालय आणि आतापर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची दुर्मीळ छायाचित्रे पाहता येतील.
- हर्बर्ट बेकर आणि एडविन लुटियन्स यांनी साकारलेल्या या वास्तूचा भव्य वारसा जवळून अनुभवता येईल.
बुकिंग आणि प्रवेशाचे नियम:
राष्ट्रपती भवनात प्रवेश करण्यासाठी काही महत्त्वाच्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे:
१. ऑनलाइन नोंदणी: केवळ अधिकृत वेबसाइट visit.rashtrapatibhavan.gov.in वरूनच आगाऊ बुकिंग करणे अनिवार्य आहे.
२. प्रवेश शुल्क: प्रति व्यक्ती फक्त 50 रुपये तिकीट आकारले जाते.
३. वेळ: मुख्य इमारत मंगळवार ते रविवार (सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4.30) खुली असते. शेवटची एन्ट्री 4 वाजता दिली जाते.
४. ओळखपत्र: प्रवेशावेळी मूळ सरकारी ओळखपत्र (आधार किंवा पॅन कार्ड) सोबत असणे गरजेचे आहे.
पर्यटकांच्या सोयीसाठी ‘सर्किट्स’:
राष्ट्रपती भवनाची सहल तीन भागात विभागलेली आहे:
- सर्किट 1: मुख्य इमारत आणि तिथली भव्य दालने (शुक्रवार ते रविवार).
- सर्किट 2: राष्ट्रपती भवन संग्रहालय (सोमवार सोडून सर्व दिवस).
- सर्किट 3: अमृत उद्यान (प्रामुख्याने ऑगस्ट ते मार्च या काळात).
कसे पोहोचायचे?
मेट्रोने प्रवास करत असाल तर ‘सेंट्रल सेक्रेटेरिएट’ (Central Secretariat) हे सर्वात जवळचे स्टेशन आहे. तिथून गेट नंबर 38 साधारण 1 किमी अंतरावर आहे. लक्षात ठेवा, सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल, कॅमेरा, बॅग किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य आत नेण्यास सक्त मनाई आहे.










