Dombivli Fire – ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पूर्व (Dombivli East)येथील सागाव परिसरात आज पहाटे ४.१५ वाजता निवासी इमारतीच्या बेसमेंटमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत तब्बल २९ दुचाकी (two-wheelers)आणि काही सायकली (bicycles) जळून खाक झाल्या असून, आग विझवताना पाच रहिवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
सागाव येथील चेडा नगर, जय भारत स्कूलजवळ असलेल्या ‘राज अपार्टमेंट’ (Raj Apartment) आणि ‘रविकिरण सोसायटी’ (‘Ravikiran Society)या जोड इमारतींच्या बेसमेंट पार्किंगमध्ये पहाटे ४.१५ च्या सुमारास अचानक आग लागली. पार्किंगमध्ये उभी असलेल्या एका दुचाकीने अचानक पेट घेतला आणि काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. रांगेत उभ्या असलेल्या इतर दुचाकींनीही पेट घेतल्याने आग वेगाने पसरली.

आगीचा भडका इतका मोठा होता की संपूर्ण परिसर धुराच्या लोटांनी व्यापला गेला. धूर जिन्यांमधून वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचल्याने रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, लहान मुले आणि वृद्धांसह अनेकांनी जीव वाचवण्यासाठी तातडीने इमारतीबाहेर धाव घेतली.
दरम्यान, आग विझवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच रहिवाशांना आगीच्या झळा आणि धुरामुळे त्रास झाला. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आगीत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (Kalyan-Dombivli Municipal Corporation) अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, अधिक तपास सुरू आहे.
हे देखील वाचा –
पंतप्रधान कार्यालयाचा बदलला पत्ता! ‘सेवा तीर्थ’ या आधुनिक संकुलातून होणार देशाचा कारभार










