Home / महाराष्ट्र / Kishori Pednekar : मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्याच सभेत राडा; महापौरांचा उशीर आणि पक्षबदलाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधक भिडले

Kishori Pednekar : मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्याच सभेत राडा; महापौरांचा उशीर आणि पक्षबदलाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधक भिडले

Kishori Pednekar : मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सभागृहाचे कामकाज आज पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळात पार पडले. नियोजित वेळेनुसार दुपारी २:३० वाजता...

By: Team Navakal
Kishori Pednekar
Social + WhatsApp CTA

Kishori Pednekar : मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सभागृहाचे कामकाज आज पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळात पार पडले. नियोजित वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सभेला सुरुवात होणे अपेक्षित असताना, महापौर रितू तावडे यांच्या अनुपस्थितीमुळे कामकाजात विलंब झाला. सभागृहाचे प्रमुखच वेळेचे पालन करत नसल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. “सभागृह प्रमुखांना शिस्त नसेल, तर नगरसेवकांकडून काय अपेक्षा ठेवायची?” असा संतप्त सवाल उपस्थित करत विरोधकांनी सुमारे १५ मिनिटे जोरदार घोषणाबाजी केली. महापौरांच्या आगमनानंतर अखेर सभेला सुरुवात झाली, मात्र सुरुवातीलाच झालेल्या या वादाने सभागृहातील वातावरण तापले होते.

आजच्या कामकाजाचा मुख्य भाग म्हणजे विविध वैधानिक पदांची अधिकृत घोषणा करणे हा होता. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला नगरसेविकेला विरोधी पक्षनेतेपदाचा मान मिळाला आहे. मात्र, ही आनंदाची लाट ओसरते न ओसरते, तोच सत्ताधारी गटाच्या सभागृहनेतेपदाची घोषणा होताच सभागृहात पुन्हा संघर्षाची ठिणगी पडली.

वडाळा मतदारसंघातून ११ हजारांच्या मताधिक्याने विजयी झालेले अमेय घोले यांची शिंदे गटाच्या सभागृहनेतेपदी निवड होताच ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमक झाले. एकेकाळी आदित्य ठाकरे यांचे निष्ठावान मानले जाणारे घोले यांनी पक्षफुटीनंतर शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांच्या निवडीचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी “५० खोके, एकदम ओक्के” अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. याला उत्तर म्हणून शिंदे गटाच्या नगरसेवकांनीही प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे दोन्ही गटांत तीव्र शाब्दिक चकमक झाली. काही काळ सभागृहात कमालीचा तणाव निर्माण झाला होता.

सभागृहाचे कामकाज आटोपल्यानंतर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. “सत्ताधारी पक्ष लोकशाहीचा गळा आवळत असून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप त्यांनी केला. मुलुंड मेट्रो अपघातातील मृताला श्रद्धांजली वाहण्याची परवानगी नाकारल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “अपघातातील मृत व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जौनपूर मतदारसंघातील होती, तरीही आम्हाला या विषयावर बोलू दिले नाही की साधी श्रद्धांजली वाहू दिली नाही. ही सत्ताधाऱ्यांची कसली वृत्ती आहे?” असा जळजळीत सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या