Home / महाराष्ट्र / Ram Raksha Movement : मंदिर लुटणार्‍यांना माफी नको ! उद्धव ठाकरेंचे रामरक्षा आंदोलन

Ram Raksha Movement : मंदिर लुटणार्‍यांना माफी नको ! उद्धव ठाकरेंचे रामरक्षा आंदोलन

Ram Raksha Movement : अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या चोरी आणि निधी अपहाराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंचा उबाठा पक्ष कमालीचा आक्रमक...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Ram Raksha Movement : अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या चोरी आणि निधी अपहाराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंचा उबाठा पक्ष कमालीचा आक्रमक बनला आहे. या चोरीचा निषेध नोंदवण्यासाठी उबाठाच्या वतीने आज दादर येथील हनुमान मंदिरात ‘रामरक्षा आंदोलन’ करण्यात आले. भरपावसात झालेल्या या आंदोलनावेळी उद्धव ठाकरेंनी आवाहन केले की, राम मंदिर लुटणार्‍यांना माफ करू नका. जागे राहा. या प्रकरणाची चौकशी होऊन निकाल लागत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसू नका.


या आंदोलनाला उबाठाचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, आदित्य ठाकरे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे उपस्थित होते. यावेळी आधी रामरक्षा स्तोत्र आणि नंतर हनुमान चालिसाच्या पठणासह महाआरती करून राज्यव्यापी आंदोलनाचा शंखनाद करण्यात आला. किशोरी पेडणेकर यांनी मारुती स्तोत्र म्हटले. या आंदोलनाला थेट अयोध्येहून आलेले काही साधू-महंत उपस्थित होते. यावेळी ‘जय श्रीराम, पवनपुत्र हनुमान की जय‘, ‘जय शिवाजी जय भवानी’ अशा घोषणाही देण्यात आल्या. महाआरती झाल्यानंतर उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, हिंदू भोळा आहे, पण तो मूर्ख नाही. जय श्रीरामाची घोषणा देऊन ते सत्तेत आले. राम मंदिराबाबत शिवसेनेने शिलापूजन आणि कारसेवा केली होती. रथयात्रा काढल्या. या मंदिरासाठी अनेक लोकांचे जीव गेले. मुंबईकरांनीही सोसले. बॉम्बस्फोट आणि दंगली झाल्या. त्यावेळी केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची आक्रमक भूमिका घेतली. ज्या राम मंदिरासाठी आपण मेहनत केली, तीच व्यक्ती आज पंतप्रधानपदी बसली आहे. मात्र, पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी शिवसेना संपण्याचा अफजलखानी विडा उचलला. ते हिंदुत्वाचा गैरफायदा घेत आहेत. अयोध्या सिर्फ झाकी आहे, आता काशी आणि मथुरा बाकी आहे. आता त्यांना काशी आणि मथुरा लुटायची आहे. मध्य प्रदेशातील महाकाळ मंदिराची जमीन लुटली. आता अयोध्याच्या बातम्या येत आहेत. बद्रीनाथमध्येही चोरी झाली. आम्ही राम मंदिरासाठी देणगी आणि चांदीची वीट दिली होती. हे सर्व कुठे गेले? हा हिंदुत्वाचा अपमान करत आहे. एका साधूने सांगितले की, राम मंदिरात जाताना आमची लंगोटीही तपासली जात आहे. साधूंना अशी वागणूक दिली जात आहे आणि याच मंदिरासाठी लोकांनी दिलेले दान गायब केले जात आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ज्याप्रकारे हिंदूंना जागे केले होते, त्याप्रमाणे आता मला पुन्हा हिंदूंना जागे करायचे आहे. राम मंदिर चोरीप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, हिंदूंना विनंती आहे की, तुम्ही जागे राहा. ते हिंदुत्वाचा गैरफायदा घेत आहेत. ज्या लोकांनी मंदिरात चोरी केली आहे. त्यांना लोकांनी जाब विचारावा. चोरांनी रामाच्या घोषणा आणि भगवा घेता कामा नये. मला म्हणता की, मी हिंदुत्व सोडले. हे काय, माझ्यासोबत आज हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मग तुम्ही कुठे आहात. हिंदूंनो, गावागावात आणि खेड्याखेड्यात श्री रामाची आरती करा, तुमच्या गावात रामाचे मंदिर नसले तर रामाचा फोटो ठेवून आरती करा. देशातील हिंदू एकजुटीने समोर आला पाहिजे. त्या चोरट्यांना तडीपार करुया, अब हिंदू माफ नही करेगा. तुमची कोणतीच मोहिनी विद्या चालणार नाही, हिंदूंनो जागे राहा, या प्रकरणाची चौकशी होऊन निकाल लागत नाही, तोपर्यंत गप्प आणि स्वस्थ बसू नका.

जेमतेम गर्दी
उबाठाने आज काढलेल्या आंदोलनाला फारशी गर्दी नव्हती. जेमतेम हजारेक उबाठा समर्थकही या आंदोलनाला उपस्थित नव्हते. त्यामुळे उबाठाचे रामरक्षा आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या