Sunil Tatkare: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात अकाली निधन झाले. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असतानाच, राजकीय वर्तुळात मात्र दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला होता.
या प्रकरणावर आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. तटकरे यांनी थेट नाव न घेता शरद पवार गटातील नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे.
“अंतिम संस्काराचीही वाट पाहिली नाही”
एका मुलाखतीत सुनील तटकरे यांनी या परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, “महाराष्ट्र हा पुरोगामी विचार मानणारा आहे आणि आपल्याकडे अंत्यविधीच्या परंपरा आहेत. मात्र, अजितदादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेले असतानाच काही जणांना विलीनीकरणाची चर्चा करण्याची घाई झाली होती. दादांची हीच अंतिम इच्छा होती, यासारखी विधाने करून ७ ते ८ नेत्यांनी टीव्हीवर मुलाखतींचा जणू सपाटाच लावला होता.”
तटकरे यांनी पुढे विचारले की, विलीनीकरणाची स्वप्ने पाहणाऱ्यांच्या मनात सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी, असा विचार का आला नाही? अजितदादांच्या निधनानंतर केवळ तीनच दिवसांत, म्हणजे ३१ जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
भाजपासोबत जाणे हीच ‘अंतिम इच्छा’
विलीनीकरणाच्या चर्चांना उत्तर देताना तटकरे यांनी अजित पवार यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यांनी स्पष्ट केले की, २०१४ पासूनच अजितदादांना भाजपासोबत सत्ता स्थापन करायची होती. २०१९ चा शपथविधी असेल किंवा २०२३ मधील एनडीएमधील प्रवेश, हे सर्व दादांनी आपल्या भूमिकेसाठीच केले होते. “निवडणूक आयोगाने घड्याळ चिन्ह आणि पक्षाचे नाव आम्हाला दिले, कारण तीच खरी राष्ट्रवादी होती आणि दादांची भाजपसोबत जाण्याचीच इच्छा होती,” असे तटकरे यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
सुनील तटकरे यांनी केलेल्या या विधानांमुळे आता पुन्हा एकदा दोन्ही गटांतील संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः त्यांनी उल्लेख केलेले ‘७ ते ८ नेते’ नेमके कोण आहेत, यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.










