Pahalgam Victim Justice: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या हल्ल्यात पुण्याचे संतोष जगदाळे यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर उघड्यावर आलेल्या जगदाळे कुटुंबाला आर्थिक आणि सामाजिक आधार देण्यासाठी त्यांची कन्या आसावरी जगदाळे हिला पुणे महानगरपालिकेत शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे.
उपमुख्यमंत्र्यांचा थेट हस्तक्षेप
संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर राज्य सरकारने वारसांना शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे वर्ष उलटले तरी आसावरीला नोकरी मिळत नव्हती. खासदार सुप्रिया सुळे यांनीही याकडे ट्विटद्वारे लक्ष वेधले होते.
ही बाब समजताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि आसावरीला तिच्या शैक्षणिक पात्रतेनुसार समकक्ष पदावर सामावून घेण्याचे आदेश दिले.
विद्यापीठाची ऑफर नाकारली, मनपावर ठाम
या प्रक्रियेत वेळ लागू नये म्हणून आसावरीला एका खासगी विद्यापीठात नोकरी देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र जगदाळे कुटुंबाने तो नाकारला. त्यांना महापालिकेतच नोकरी हवी होती. महापालिका स्तरावर वर्ग 3 किंवा 4 ची नोकरी देणे शक्य असते, पण आसावरीच्या पात्रतेनुसार तिला वर्ग 2 ची नोकरी मिळावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. आता विशेष बाब म्हणून या नियुक्तीला मंजुरी देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.
कर्तव्यदक्षता आणि सहानुभूती
एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी जगदाळे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले होते. त्यावेळी दिलेला शब्द त्यांनी आता पूर्ण केला आहे. “शासन सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेत असून, एका विशेष प्रकरणाद्वारे आसावरीच्या नियुक्तीला मान्यता दिली जाईल,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे जगदाळे कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून आसावरीच्या करिअरला नवी दिशा मिळणार आहे.










