Modi-Macron Meeting : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. दोन्ही नेत्यांमध्ये पार पडलेल्या द्विपक्षीय बैठकीत व्यापार आणि तंत्रज्ञान या विषयांवर सखोल चर्चा झाली.
या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी भारत आणि फ्रान्समधील ‘विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी’ अधिक दृढ झाल्याचे जाहीर केले. मात्र, या भाषणाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे मोदींनी मॅक्रॉन यांच्यासमोर केलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ऐतिहासिक पराक्रमाचा उल्लेख.
मार्सेलिस बंदर आणि सावरकरांचा संकल्प
पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षीच्या आपल्या फ्रान्स दौऱ्यातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, “मागील वर्षी मी फ्रान्समधील मार्सेलिस शहराला भेट दिली होती. हे केवळ फ्रान्सचे मोठे बंदर नसून भारताच्या इतिहासाशी जोडलेले एक महत्त्वाचे ठिकाण आहे. याच बंदरावर ८ जुलै १९१० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी समुद्रात ‘हनुमान उडी’ घेतली होती.”
सावरकरांना लंडनहून ‘मोरिया’ बोटीने भारतात आणले जात असताना त्यांनी मार्सेलिसजवळ बोटीतून उडी मारली आणि सुमारे ६० यार्ड अंतर पोहून फ्रान्सचा किनारा गाठला होता. सावरकरांचा हा धाडसी निर्णय भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अतूट संकल्पाचे प्रतीक असल्याचे मोदींनी नमूद केले.
पहिल्या महायुद्धातील भारतीय सैनिकांचे स्मरण
पंतप्रधानांनी यावेळी पहिल्या महायुद्धातील भारतीय सैनिकांच्या बलिदानाचाही उल्लेख केला. “मार्सेलिस हे तेच शहर आहे जिथे पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी युरोपच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले होते. आजही तिथे त्यांच्या शौर्याच्या कथा सांगितल्या जातात,” असे गौरवउद्गार मोदींनी काढले.
पंतप्रधानांनी मॅक्रॉन यांचे स्वागत करताना ‘भारताचे प्रवेशद्वार’ (Gateway of India) असलेल्या मुंबईचा उल्लेख केला आणि एआय (AI) परिषदेच्या माध्यमातून दोन्ही देशांतील संबंध नवीन उंचीवर नेण्याचा विश्वास व्यक्त केला.











