Bhiwandi Mayor Election 2026 : गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये आज अखेर लोकशाहीची प्रक्रिया पूर्ण झाली. महापौरपदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांनी अनपेक्षित विजय संपादन केला आहे. या विजयामुळे भाजपला आपल्याच बालेकिल्ल्यात मोठा राजकीय धक्का बसला असून, शहराच्या राजकारणात नवीन समीकरणे उदयाला आली आहेत.
महानगरपालिकेच्या ‘स्व. विलासरावजी देशमुख’ सभागृहात आज दुपारी १२ वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. पीठासीन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी एकूण १० नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. छाननी प्रक्रियेदरम्यान, भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांनी दाखल केलेले दोन्ही अर्ज वैध ठरले. नियमानुसार, एका उमेदवाराचे एकापेक्षा अधिक अर्ज वैध ठरल्यास त्यापैकी एकच अर्ज अंतिम प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जातो; त्याप्रमाणे पीठासीन अधिकाऱ्यांनी चौधरी यांचा एक अर्ज निवडणुकीसाठी अधिकृत मानला.
निवडणूक प्रक्रियेचा पुढचा टप्पा म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निर्धारित १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. याच काळात सभागृहात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. कोणार्क विकास आघाडीचे उमेदवार विलास पाटील हे पोलीस संरक्षणात (पोलीस एस्कॉर्ट) महापालिकेकडे येत होते. ते वेळेत पोहोचू शकणार नसल्याचे लक्षात येताच, त्यांच्या समर्थकांनी आणि काही नगरसेवकांनी निवडणूक प्रक्रिया काही काळ थांबवून वेळ वाढवून देण्याची विनंती पीठासीन अधिकाऱ्यांकडे केली.
मात्र, पीठासीन अधिकाऱ्यांनी लोकशाही प्रक्रियेतील नियमांचे काटेकोर पालन करत ही मागणी फेटाळून लावली. “ठरवून दिलेल्या वेळेत बदल करणे नियमाबाह्य ठरेल,” असे स्पष्ट करत त्यांनी प्रक्रिया थांबवण्यास ठाम नकार दिला.
त्यानंतर सुरुवातीला अनेक इच्छुकांनी दंड थोपटले असले, तरी अंतिम क्षणी सहा उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतल्याने निवडणूक रिंगणातील चित्र पालटले. यामध्ये कोणार्क विकास आघाडीचे मयुरेश पाटील आणि प्रतिभा पाटील, शिवसेना (शिंदे गट) कडून बाळाराम चौधरी आणि सुचिता म्हात्रे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारिक मोमीन, तसेच भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांचा प्रामुख्याने समावेश होता. या मान्यवरांच्या माघारीमुळे निवडणुकीतील चुरस अधिकच वाढली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या या प्रक्रियेनंतर महापौरपदासाठीची लढत त्रिकोणी स्वरूपाची असल्याचे निश्चित झाले. यामध्ये प्रामुख्याने तीन गट आमनेसामने उभे ठाकले आहेत. भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेक्युलर फ्रंटने पाठिंबा जाहीर केल्याने त्यांची बाजू भक्कम झाली. त्यांच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट) कडून विलास पाटील यांनी शड्डू ठोकला आहे, तर भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून स्नेहा पाटील या रिंगणात होत्या.
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक ही केवळ सत्तेची लढाई न ठरता, ती राजकीय निष्ठा आणि अनपेक्षित समीकरणांचा एक रंजक अध्याय ठरली आहे. या संपूर्ण सत्तानाट्याच्या केंद्रस्थानी भारतीय जनता पक्षाचे बंडखोर नेते नारायण चौधरी राहिले आहेत. प्रारंभी, भाजपच्या गोटातून महापौरपदासाठी चौधरी यांचे नाव अग्रक्रमाने चर्चेत होते; मात्र ऐनवेळी पक्षाने अनपेक्षित निर्णय घेत स्नेहा पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आणि नाराज झालेल्या नारायण चौधरी यांनी थेट बंडाचे निशाण फडकवले.
नारायण चौधरी यांनी भाजपला रामराम ठोकत तत्काळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या संयुक्त ‘सेक्युलर फ्रंट’ मध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे महापालिकेतील गणिते पूर्णपणे बदलली. काँग्रेसने तातडीने चौधरी यांना आपला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आणि आपल्या सर्व नगरसेवकांना त्यांच्याच बाजूने मतदान करण्यासाठी ‘व्हीप’ (पक्षादेश) जारी केला. यामुळे भाजपसमोर आपल्याच माजी नेत्याचे मोठे आव्हान उभे राहिले. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने स्नेहा पाटील यांच्यासाठी, तर शिवसेना (शिंदे गट) कडून रिंगणात असलेल्या विलास पाटील यांच्यासाठी आपापल्या पक्षांनी कडक पक्षादेश लागू केला होता.
निवडणुकीच्या दिवशी सभागृहात एक तांत्रिक पेचही निर्माण झाला होता. शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार विलास पाटील हे सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांना मतदानासाठी आणण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस संरक्षणात (एस्कॉर्ट) येत असताना त्यांना सभागृहात पोहोचण्यास विलंब झाला. त्यांच्या समर्थकांनी हा विलंब लक्षात घेता मतदान प्रक्रिया काही काळ पुढे ढकलण्याची विनंती केली होती; मात्र पीठासीन अधिकाऱ्यांनी नियमांचे बोट धरत, नियोजित वेळेत कोणताही बदल करण्यास नकार दिला. आणि मतदान प्रक्रिया नियोजित वेळेनुसार पार पडली.
पाहा मतदानाची आकडेवारी-
निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून सभागृहात पारदर्शकतेसाठी ‘हात वर करून’ मतदान घेण्याची पद्धत स्वीकारण्यात आली होती.
१. नारायण चौधरी – ४८ मते
२. विलास पाटील – २५ मते
३. स्नेहा पाटील – १६ मते
मतदानाची प्रक्रिया सुरू होताच ‘सेक्युलर फ्रंट’ने आपली सर्व मते नारायण चौधरी यांच्या पारड्यात टाकली.
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीपाठोपाठ उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही अनपेक्षित निकाल समोर आले आहेत. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या प्रक्रियेत मोमीन तारिक बारी यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपमहापौरपदावर आपले नाव कोरले आहे. त्यांना एकूण ४३ मते प्राप्त झाली असून, पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांना अधिकृतपणे विजयी घोषित केले. महापौर आणि उपमहापौर अशा दोन्ही महत्त्वाच्या पदांवर ‘सेक्युलर फ्रंट’चे वर्चस्व निर्माण झाल्याने महापालिकेच्या सत्ताकारणात मोठे फेरबदल झाले आहेत.
विशेष म्हणजे, या निवडणुकीपूर्वी महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याचे चित्र रंगवले जात होते. कागदावरील आकडेवारी महायुतीच्या बाजूने झुकलेली असतानाही, ऐनवेळी झालेल्या राजकीय घडामोडींनी सर्व गणिते उलथवून लावली. भारतीय जनता पक्षातील अंतर्गत नाराजी आणि उमेदवारी वाटपावरून झालेली उघड बंडखोरी यांचा थेट फटका पक्षाला बसला. दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि समाजवादी पार्टी यांच्या ‘सेक्युलर फ्रंट’ ने आखलेली चोख रणनीती आणि दाखवलेली अभेद्य एकजूट यामुळे भाजपला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला.
Bhiwandi Mayor Election 2026: उमेदवारांना मिळालेली एकूण मते पुढील प्रमाणे-
१. नारायण चौधरी
काँग्रेस – ३०
राष्ट्रवादी श.प – १२
भाजप – ६
२.विलास पाटील
कोणार्क विकास आघाडी -४
शिवसेना – १२
समाजवादी – ६
भिवंडी विकास आघाडी – ३
३.स्नेहा पाटील
भाजप -१६
एक अपक्ष गैरहजर














