NHAI Toll : राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी लवकरच एक मोठा बदल होणार आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) देशभरातील टोल नाक्यांवरील रोख व्यवहारांची पद्धत पूर्णपणे बंद करण्याच्या तयारीत आहे.
१ एप्रिल २०२६ पासून टोल नाक्यांवर केवळ डिजिटल पद्धतीनेच पैसे स्वीकारले जातील, असे संकेत प्राधिकरणाने दिले आहेत.
काय आहे नवा प्रस्ताव?
रिपोर्टनुसार, टोल नाक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी एनएचएआयने हा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमाची अंमलबजावणी झाल्यानंतर टोल भरण्यासाठी केवळ ‘फास्टॅग’ (FASTag) किंवा ‘यूपीआय’ (UPI) यांसारख्या डिजिटल पर्यायांचाच वापर करावा लागेल. रोखीने टोल भरण्याची सुविधा बंद झाल्यामुळे टोल नाक्यांवरील रांगा कमी होतील आणि प्रवाशांचा वेळ वाचेल.
डिजिटल व्यवहारांवर भर का?
१. वाहतूक कोंडीतून सुटका: टोल नाक्यांवर सुटे पैसे देण्यावरून होणारे वाद आणि त्यामुळे लागणाऱ्या रांगा यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतो. डिजिटल व्यवहारामुळे गाड्या वेगाने पुढे सरकतील.
२. पारदर्शकता: सर्व व्यवहार ऑनलाइन असल्याने टोल वसुलीत अधिक अचूकता आणि पारदर्शकता येईल.
३. फास्टॅगचा वापर: सध्या देशात ९८ टक्क्यांहून अधिक वाहनांवर फास्टॅग आहे. त्यामुळे हा बदल स्वीकारणे प्रवाशांसाठी सोपे जाणार आहे.
सध्याचे नियम काय सांगतात?
सध्याच्या नियमांनुसार, जर एखाद्या वाहनावर वैध फास्टॅग नसेल आणि प्रवाशाने रोखीने टोल भरला, तर त्याला दुप्पट शुल्क द्यावे लागते. तसेच यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट केल्यास १.२५ पट शुल्क आकारले जाते. मात्र, १ एप्रिल २०२६ पासून रोख रक्कम स्वीकारणे पूर्णपणे बंद केले जाऊ शकते.
देशभरातील सुमारे १,१५० पेक्षा जास्त टोल नाक्यांवर हा बदल लागू होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे महामार्गावरील प्रवास अधिक सुसह्य होईल आणि ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास एनएचएआयने व्यक्त केला आहे.










