Home / महाराष्ट्र / Ramesh Mhatre Bail Update: अटकेनंतर अवघ्या 6 दिवसांत सुटका; डोंबिवली रुग्णालय मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेंना जामीन मंजूर

Ramesh Mhatre Bail Update: अटकेनंतर अवघ्या 6 दिवसांत सुटका; डोंबिवली रुग्णालय मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेंना जामीन मंजूर

Ramesh Mhatre Bail Update: डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका मारहाण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी, शिवसेनेचे माजी नगरसेवक...

By: Team Navakal
Ramesh Mhatre Bail Update: अटकेनंतर अवघ्या 6 दिवसांत सुटका; डोंबिवली रुग्णालय मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेंना जामीन मंजूर
Social + WhatsApp CTA

Ramesh Mhatre Bail Update: डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका मारहाण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी, शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अटक झाल्यानंतर अवघ्या 6 दिवसांच्या आत रमेश म्हात्रेंचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. कल्याण न्यायालयातील न्यायाधीश के एस कातकाडे यांनी त्याला 50000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात म्हात्रेंच्या वतीने सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालाचा आधार घेत न्यायालयाने हा निर्णय घेतला. अहवालानुसार, रमेश म्हात्रे यांना केवळ एकच किडनी असून त्यांची तब्येत खालावली आहे. त्यांचा रक्तदाब प्रचंड वाढला असून त्यांना ब्रेन स्ट्रोक येण्याचा गंभीर धोका असल्याचा दावा डॉक्टरांनी केला होता. या वाढत्या आजारपणाचा विचार करून न्यायालयाने अखेर त्यांना अटी शर्तींसह जामीन मंजूर केला आहे.

नाट्यमय घडामोडी आणि संशयाची सुई; पोलीस कोठडीऐवजी थेट सिव्हिल रुग्णालयात मुक्काम

या संपूर्ण प्रकरणात अटक झाल्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींवरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या संशयास्पद बाबी खालीलप्रमाणे समोर आल्या आहेत:

  • अटकेपूर्वीची स्थिती: मारहाण आणि रुग्णालयात गोंधळ घालण्यापूर्वी रमेश म्हात्रे पूर्णपणे निरोगी होते. त्याने या संदर्भात जाहीर पत्रकार परिषदही घेतली होती, जिथे त्याचा रक्तदाब अगदी सामान्य होता.
  • अटकेनंतर अचानक आजारपण: पोलिसांच्या ताब्यात येताच म्हात्रेला उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्याला कल्याण-डोंबिवली परिसरातील स्थानिक रुग्णालयात ठेवण्याऐवजी आधी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि नंतर थेट ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले.
  • नाटकाचा आरोप: केवळ पोलीस कोठडी टाळण्यासाठी आणि रुग्णालयात सुरक्षित मुक्काम ठोकण्यासाठीच आजारपणाचे हे नाटक रचले गेल्याचा आरोप आता विरोधक आणि स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप; डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

केवळ डॉक्टरांनी फोन उचलला नाही, या साध्या कारणावरून रुग्णालयात घुसून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप म्हात्रेंवर आहे. या प्रकरणातील आरोपीला इतक्या लवकर जामीन मिळाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र चिंता आणि संताप व्यक्त केला जात आहे:

अहोरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांवर आणि परिचारिकांवर शासकीय रुग्णालयातच असे हल्ले होत असतील, तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

या जामीन निर्णयानंतर डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील परिचारिकांनी आणि विविध डॉक्टरांच्या संघटनांनी निषेधाचे सत्र सुरू केले असून आक्रमक पवित्रा घेतला आहे.

जोपर्यंत अशा राजकीय प्रवृत्तींना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत, असे म्हणत वैद्यकीय संघटनांनी डॉक्टर संरक्षण कायद्याची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

    Web Title:
    संबंधित बातम्या