Ajit Pawar Plane Crash: राज्याच्या राजकारणात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असतानाच आजपासून (23 फेब्रुवारी) अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बिगुल वाजणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सत्ताधारी पक्षाच्या चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली.
राज्याचा वर्ष 2026-27 चा अर्थसंकल्प येत्या 6 मार्च रोजी सभागृहात मांडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अधिवेशनात एकूण 15 महत्त्वाची विधेयके मंजुरीसाठी आणली जाणार आहेत. या परिषदेला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.
अजित पवार अपघात तपासावर महत्त्वाचे भाष्य
या पत्रकार परिषदेत गेल्या महिन्यात बारामती विमानतळाजवळ झालेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दाही गाजला. 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या या घटनेबाबत विरोधकांकडून विशेषतः आमदार रोहित पवार यांच्याकडून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर बाजू मांडली.
१. १३ मानकांवर तपास: मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, डीजीसीए (DGCA) या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहे. तपासासाठी 13 निकष ठरवण्यात आले आहेत. डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर आणि व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा तपासासाठी उपलब्ध झाला आहे.
२. परदेशी तज्ज्ञांची मदत: संबंधित विमान परदेशातील बनावटीचे असल्याने तांत्रिक बाबींच्या तपासासाठी परदेशी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. तसेच ज्या कंपनीचे हे विमान होते, त्या ‘व्हीएसआर’ कंपनीच्या सर्व विमानांचे ऑडिट सध्या सुरू आहे.
३. पारदर्शक चौकशीचे आश्वासन: “कोणालाही संशय असेल तर त्यांनी पत्राद्वारे माहिती द्यावी, आम्ही ती डीजीसीएला पाठवू. प्रत्येक शंकेचे समाधान झाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
“लपवण्यासारखे काहीच नाही”
या प्रकरणातील राजकीय आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांनी स्वतः देखील त्याच विमानातून 4 ते 5 वेळा प्रवास केला आहे. अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या कंपन्यांच्या विमानांचा वापर करतात. हा एक दुर्दैवी अपघात असून, यावर राजकारण करून अजित पवार यांच्या कुटुंबाला अधिक क्लेश होईल असे वर्तन कोणीही करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. अंतिम अहवाल येईपर्यंत सर्वांनी संयम राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.











