Home / देश-विदेश / Sonam Wangchuk : उपोषणामुळे वजन ९ किलोने घटले, मूत्रपिंड निकामी होण्याचा मोठा धोका ; सोनम वांगचुक यांच्या ढासळत्या प्रकृतीवरून दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला सुनावले खडे बोल..

Sonam Wangchuk : उपोषणामुळे वजन ९ किलोने घटले, मूत्रपिंड निकामी होण्याचा मोठा धोका ; सोनम वांगचुक यांच्या ढासळत्या प्रकृतीवरून दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला सुनावले खडे बोल..

Sonam Wangchuk : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG) पेपरफुटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी गेल्या...

By: Team Navakal
Sonam Wangchuk
Social + WhatsApp CTA

Sonam Wangchuk : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG) पेपरफुटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी गेल्या १८ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले लडाखचे ख्यातनाम पर्यावरणवादी व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने आज अत्यंत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. वांगचुक यांच्या ढासळत चाललेल्या आरोग्याची गांभीर्याने दखल घेत, न्यायालयाने त्यांना २४ तास चोख वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्याचे आणि आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार पुरवण्याचे कडक निर्देश दिल्ली तसेच केंद्र सरकारला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या हस्तक्षेपानंतरही, केंद्र सरकारने अद्याप आंदोलनाबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतलेले नाही.

जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी; ‘जीवन अमूल्य आहे’ म्हणत केंद्र सरकारची न्यायालयात ग्वाही
सोनम वांगचुक यांच्या आरोग्याकडे केंद्र सरकारचे तातडीने लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ॲड. राकेश कुमार सैनी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका (PIL) दाखल केली होती. वांगचुक यांची प्रकृती पाहता त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. विषयाचे गांभीर्य ओळखून मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने यावर तात्काळ नियमित सुनावणी घेतली.

या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. “केंद्र सरकारच्या विशेष निर्देशांनुसार, सरकारी डॉक्टरांचे पथक सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्याने बारीक लक्ष ठेवून आहे. कोणत्याही नागरिकाचे जीवन अमूल्य असून, त्याचे प्राण वाचवण्यासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर आणि वैद्यकीय उपाययोजना करणे हे सरकार आपले आद्य कर्तव्य मानते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वांगचुक यांच्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी जे काही उपचार आवश्यक असतील, ते सर्व पुरवण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे,” असे प्रतिज्ञापत्र मेहता यांनी न्यायालयासमोर सादर केले. या निवेदनावर समाधान व्यक्त करत खंडपीठाने डॉक्टरांना रोजच्या रोज त्यांच्या प्रकृतीचा अहवाल घेण्याचे आदेश दिले.

डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल: शरीरातील स्नायूंचे विघटन, मूत्रपिंडाला (Kidney) गंभीर धोका
सध्या नवी दिल्लीतील नामांकित राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयातील ४ ते ५ तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दिवसातून दोनदा जंतरमंतर येथील उपोषण स्थळी जाऊन वांगचुक यांच्या विविध चाचण्या करत आहे. या वैद्यकीय पथकाचे प्रमुख वरिष्ठ जनरल फिजिशियन डॉ. सतीश लांबा यांनी वांगचुक यांच्या प्रकृतीचा अधिकृत मापदंड अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार:

रक्तातील साखर (Blood Sugar): ८० mg/dL

नाडीचे ठोके (Pulse Rate): ७२ प्रति मिनिट

रक्तदाब (Blood Pressure): झोपलेल्या स्थितीत १०५/६१ आणि बसलेल्या स्थितीत १०१/६५ (रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी झाला आहे).

डॉक्टरांनी स्पष्ट केले की, वांगचुक यांचे वजन तब्बल ८.९ किलोने घटले असून, प्रदीर्घ उपवासामुळे त्यांच्या शरीराने साठवलेल्या कर्बोदकांऐवजी आता अंतर्गत चरबी व स्नायूंच्या ऊतींचे (Muscle Tissues) विघटन करून ऊर्जा मिळवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे त्यांच्या शरीरात युरिक ॲसिडची पातळी वेगाने वाढत असून लघवीमध्ये ‘कीटोन्स’ आढळले आहेत. सध्या त्यांचे मूत्रपिंड सामान्य कार्य करत असले, तरी उपोषण असेच सुरू राहिल्यास मूत्रपिंड निकामी (Kidney Damage) होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. जबरदस्तीने अन्न भरवण्याबाबत (Force Feeding) बोलताना डॉ. लांबा यांनी सांगितले की, यासाठी आधी रुग्णाची संमती आवश्यक असते. जर प्रकृती अधिक खालावली, तर अन्ननलिकेत नळी टाकण्याऐवजी शिरेद्वारे (Intravenous Support) इलेक्ट्रोलाइट्स, डेक्स्ट्रोज आणि सलाईन देणे अधिक सुरक्षित ठरेल.

कलाकारांचा आणि विचारवंतांचा पाठिंबा; अतुल कुलकर्णींचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण
सोनम वांगचुक यांच्या या देशव्यापी लढ्याला देशभरातून आणि विविध क्षेत्रांतून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने जंतरमंतरवर जाऊन वांगचुक यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आज मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत अभ्यासू व अष्टपैलू अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी थेट आंदोलनस्थळी धाव घेतली. वांगचुक यांच्या मागण्यांना पूर्ण समर्थन देत आणि केंद्र सरकारला संवेदनशीलतेचे आवाहन करण्यासाठी अतुल कुलकर्णी यांनी आज एक दिवसाचे लाक्षणिक (प्रतिकात्मक) उपोषण केले. त्यांच्या या सहभागामुळे आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या