Splitsvilla 7 Fame Mayank Pawar Passes Away : मनोरंजन आणि फिटनेस क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि चटका लावणारी बातमी समोर आली आहे. आपल्या शरीरयष्टीने आणि दिलखुलास स्वभावाने लाखो तरुणांचे प्रेरणास्थान बनलेला प्रसिद्ध फिटनेस मॉडेल आणि सात वेळा ‘मिस्टर इंडिया’ ठरलेला मयंक पवार याचे निधन झाले आहे. अवघ्या ३७ व्या वर्षी मयंकने जगाचा निरोप घेतल्यामुळे त्याचे चाहते, कुटुंबीय आणि फिटनेस प्रेमींमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
मयंकच्या निधनाचे वृत्त त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून देण्यात आले. या पोस्टमध्ये मयंकला केवळ एक सार्वजनिक व्यक्तिमत्वच नव्हे, तर एक लाडका भाऊ, विजेता, मार्गदर्शक आणि अनेकांसाठी आशेचा किरण म्हणून गौरवण्यात आले आहे. “मयंक नेहमीच आपल्या हृदयात जिवंत राहतील,” अशा शब्दांत त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, १ जानेवारी २०२६ रोजी मयंकने आपला वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा केला होता. त्यावेळी सोशल मीडियावर सकारात्मक राहण्याचा संदेश देणाऱ्या त्याच्या पोस्टमुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे वाटत होते; मात्र अचानक आलेल्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. मयंकच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
मयंक पवारची ओळख केवळ फिटनेस मॉडेलपुरती मर्यादित नव्हती. तो एक यशस्वी सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर देखील होता. त्याने केवळ शरीरसौष्ठव स्पर्धेत छाप पाडली नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘मिस्टर एशिया’ हा बहुमान मिळवून देशाची मान अभिमानाने उंचवली होती. त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे अनेक नवोदित खेळाडूंसाठी तो एक आदर्श ‘रोल मॉडेल’ ठरला होता.
रिअॅलिटी शोच्या विश्वातही मयंकने आपला वेगळा ठसा उमटवला होता. ‘एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला’ सीझन ७ मध्ये सहभागी झाल्यानंतर तो घराघरात पोहोचला. या शोमध्ये त्याची प्रामाणिकता, खेळाडूवृत्ती आणि स्पष्टवक्तेपणा प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. शो दरम्यानच्या एका टास्कमध्ये गंभीर दुखापत झाली असतानाही, मयंकने हार न मानता आपला लढा सुरू ठेवला होता. त्याच्या याच जिद्दीमुळे तो शोचा सर्वात लोकप्रिय स्पर्धक ठरला.
मयंकच्या एक्झिटचा (एलिमिनेशन) तो प्रसंग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. तो स्पर्धेतून बाहेर पडत असताना शोची होस्ट आणि अभिनेत्री सनी लिओनी अत्यंत भावूक झाली होती आणि तिला अश्रू अनावर झाले होते. इतकेच नव्हे तर, निखिल चिनप्पाने देखील त्याला प्रेमाने मिठी मारून निरोप दिला होता. एका रिअॅलिटी शोच्या स्पर्धकाने तिथल्या परीक्षकांच्या आणि होस्टच्या मनात एवढे आदराचे स्थान निर्माण करणे ही दुर्मिळ गोष्ट मानली जाते.











