Israel Vs Iran War : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे मध्य पूर्वेतील आकाशात युद्धाचे ढग दाटले आहेत. इराणने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिकच चिघळली असून, याचे थेट पडसाद विमानसेवेवर उमटले आहेत. सुरक्षा कारणास्तव दुबई विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आल्यामुळे पुणे आणि दुबई दरम्यानची विमानवाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
विमानसेवा स्थगित आणि प्रवाशांचे हाल
पुणे ते दुबई आणि दुबई ते पुणे या मार्गावर धावणारी दोन प्रमुख कंपन्यांची विमाने आज आणि उद्यासाठी रद्द करण्यात आली आहेत. पुण्यातून दुबईला जाणारी दोन विमाने रद्द झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईचे हवाई क्षेत्र असुरक्षित बनल्याने तेथील विमानतळ प्रशासनाने सेवा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दुबईत पुण्यातील ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षक अडकले
या आंतरराष्ट्रीय तणावादरम्यान पुण्यातील एका नामांकित विद्यालयाचे ८४ जण दुबईमध्ये अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षकांचा समावेश आहे. हे विद्यार्थी ‘स्टडी व्हिजिट’ (शैक्षणिक सहली) साठी दुबईला गेले होते. विमानतळ बंद झाल्यामुळे त्यांना मायदेशी परतणे कठीण झाले आहे. या ८४ जणांच्या समूहात ४२ मुले आणि ४२ मुलींचा समावेश आहे.
महाविद्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका
विद्यार्थी अडकल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, संबंधित महाविद्यालयाचे डीन जनार्दन पवार यांनी अधिकृत माहिती देत स्पष्ट केले की, सर्व ८४ जण सुरक्षित ठिकाणी असून पालकांनी घाबरून जाऊ नये. महाविद्यालय प्रशासन सातत्याने दुबईतील शिक्षक, भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्कात आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून या विद्यार्थ्यांना विशेष विमानाने किंवा सुरक्षित मार्गाने परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
भारतीय दूतावासाचे आवाहन आणि संपर्क यंत्रणा
परराष्ट्र मंत्रालयाने इराण आणि दुबईमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची नियमावली जारी केली आहे. नागरिकांनी त्वरित दूतावासाशी संपर्क साधून आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संकटात अडकलेल्या भारतीयांसाठी खालील संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत:
टोल फ्री क्रमांक: 800-46342
व्हॉट्सॲप क्रमांक: +971543090571
भारतीय दूतावासाकडून लवकरच ‘रेस्क्यू ऑपरेशन’ (बचाव मोहीम) राबवून अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.











